महत्वाच्या बातम्या

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित


- उद्योगासाठी मिळणार ५० लाखापर्यंत कर्ज

- ६३० युवक युवतींना योजनेचा लाभ देणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गंत २०२३-२४ वर्षासाठी उद्योग व सेवा उद्योग उपक्रमांसाठी सुशिक्षित बेरोजगारांना ५० लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेला जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून मागील वर्षी २५५ कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणावर कर्ज प्रकरणे पोर्टलवर दाखल होत असून विविध बँक शाखांच्या माध्यमातून कर्जप्रकरणांना मंजूरी मिळत आहे. सन २०२३-२४ साठी जिल्ह्याला ६३० युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातुन लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय १८ ते ४५ वर्ष आहे, असे लाभार्थी पात्र आहेत. अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांना पाच वर्ष शिथिल आहे. रुपये १० लाखांच्या प्रकल्पासाठी शैक्षणिक पात्रता ७ वी पास तसेच २५ लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी शैक्षणिक पात्रता १० वी पास असावी. या योजनेत सेवा उद्योग तसेच कृषिपुरक उद्योग, व्यवसायासाठी २० लाख रुपये तसेच उत्पादन प्रकल्पाच्या प्रवर्गासाठी ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध असुन एकुण प्रकल्प किंमतीच्या शहरी भागासाठी २५ टक्के व ग्रामीण भागासाठी ३५ टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे.

सदर योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. आपला उद्योग व्यवसाय उभारणीसाठी शासनाच्या https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थावर भेट देऊन आपले गाव ज्या बँक शाखेत येते त्या बँकेची निवड करुन अर्ज जवळच्या सेतु सुविधा केंद्रात, मोबाईलवरुन अथवा जिल्हा उद्योग केंद्रात दाखल करावा, असे जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos