काँग्रेस पक्षात परिवारवाद आहे, मात्र भाजपा हाच एक परिवार आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी


- बूथ प्रमुखांशी साधला संवाद 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली
: 'भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांनी तयार केलेला पक्ष आहे. हा पक्ष लोकशाही तत्त्वावर चालणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षात परिवारवाद आहे. मात्र, भाजपा हाच एक परिवार आहे. काँग्रेस कल्चर म्हणजे वाईट वृत्ती, अशी टीका  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.  
गडचिरोली येथे अभिनव लॉन मध्ये 'बूथ प्रमुखांशी संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन आज २३ जानेवारी रोजी   करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी बारामती, गडचिरोली, हिंगोली, नंदूरबार व नांदेड या पाच लोकसभा क्षेत्रातील बूथ प्रमुखांशी व्हीडिओ कॉन्फरंसींगद्वारे संवाद साधला. 
या कार्यकमाला  केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे आदिवासी विकास व वनराज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खा.अशोक नेते, भाजपचे पूर्व विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, विधान परिषद सदस्य आ.डॉ.रामदास आंबटकर, आ.डॉ.देवराव होळी, आ.क्रिष्णा गजबे, आ.कीर्तिकुमार भांगडिया, आ.संजय पुराम, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, बाळा अंजनकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, माजी जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, नगरपरिषदांचे सदस्य व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधानांनी आपल्या संवादाची सुरुवात मराठी भाषेतून करुन उपस्थितांना मोहिनी घातली. 'सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करतो. बाळासाहेबांनी सामान्य माणसासाठी काम केले. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे', असे पंतप्रधान म्हणाले. 
 यावेळी खा.अशोक नेते यांनी हा जिल्हा देशातील सर्वांत मागास, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त जिल्हा असून, देशातील ११५ आकांक्षित जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्याचा समावेश होत असल्याचे सांगितले. रस्त्यांसाठी १२२४६ कोटी रुपये मिळाले असून, सडक योजना, उज्ज्वला गॅस, आवास, सौभाग्य योजना इत्यांदीमुळे जिल्ह्याचा विकास होत असल्याचे पंतप्रधानांना सांगितले. नागभिड-नागपूर रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला गती द्यावी, तसेच ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, अशा प्रमुख दोन मागण्या केल्या. त्यानंतर मार्कडादेव येथील नरेंद्र अलसावार यांनी नक्षलवादावर प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले. आपण नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर दिले. त्यामुळे विकास होत आहे. जवानांनी नक्षल्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याबद्दल मी त्यांना नमन करतो. पूर्वी देशात १२६ नक्षलग्रस्त जिल्हे होते. आता त्यात घट होऊन ही संख्या ९० झाली. पूर्वी देशात सर्वांत जास्त नक्षलप्रभावीत ३६ जिल्हे होते. आता ते केवळ ३० राहिले आहेत. आम्ही नक्षलग्रस्त भागात ४५०० किलोमीटरचे रस्ते निर्माण केले. २४०० मोबाईल टॉवर्स उभारले, तर ४ हजार टॉवर्सना मंजुरी दिली आहे. या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय व नवोदय विद्यालये, बँका, एटीएमचे जाळे निर्माण केले. विकास होत असल्याने नक्षलवाद कमी झाला, असे पंतप्रधानांनी सांगितले.  



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-01-23






Related Photos