विरोधकांच्या सभेत सहभागी झालेल्या २३ नेत्यांपैकी नऊ जण पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार : अमित शहा


वृत्तसंस्था / मालदा :  'विरोधकांची महाआघाडी नव्हे, तर ही लालचीपणाची महाआघाडी आहे. कोलकात्यात झालेल्या विरोधकांच्या सभेत सहभागी झालेल्या २३ नेत्यांपैकी नऊ जण पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार आहेत. असे हे २०-२५ नेते एका व्यासपीठावर येऊन काहीही होणार नाही. नरेंद्र मोदी हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असून, पुन्हा तेच पंतप्रधान बनतील,' अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी विरोधकांवर निशाणा साधला. 
अमित शहा यांनी मंगळवारी पश्चिम बंगालमधील मालदा येथे 'लोकशाही बचाव' यात्रा काढून आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या वेळी त्यांनी  विरोधकांसह तृणमूल काँग्रेस व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. 'ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार 'खुनी सरकार' असून, आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे. या सरकारला सत्तेतून उखडून टाका,' असे आवाहन त्यांनी केले. 
'बंगालमधील आश्रितांसाठी तृणमूल काँग्रेसने आजपर्यंत काहीच केले नाही. परंतु, आम्ही नागरिकत्व कायद्यानुसार सर्व आश्रितांना नागरिकत्व देऊ. मोदी सरकार नागरिकत्व विधेयक मंजूर करण्यासाठी कटिबद्ध आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून, राज्यसभेत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) बहुमत नसल्याने प्रलंबित आहे. ममता बॅनर्जी या विधेयकाला समर्थन देणार आहेत का? त्या समर्थन देणार नाहीत, याचा मला विश्वास आहे. कारण, तृणमूल काँग्रेस केवळ घुसखोरांसाठी काम करते. त्यांचे समर्थन करण्यातच ते धन्यता मानत आहेत,' अशी टीका शहा यांनी केली. 
'विरोधकांची महाआघाडी ही लालचीपणाची महाआघाडी आहे. त्यांना केवळ मोदींना पंतप्रधानपदावरून हटवायचे आहे. तर, आम्हाला देशातून गरिबी आणि भ्रष्टाचाराला हटवायचे आहे. पुन्हा भ्रष्टाचारात सामील होण्यासाठी त्यांना 'कमकुवमत सरकार' हवे आहे. तर, आम्हाला पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यासाठी 'मजबूत सरकार' हवे आहे. आता जनतेला 'कमकुमवत सरकार' हवे आहे की 'मजबूत सरकार' हवे आहे, हे त्यांनीच ठरवावे. कोलकात्यात झालेल्या विरोधी पक्षांच्या सभेत एकदाही 'भारत माता की जय' किंवा 'वंदे मातरम'चा नारा देण्यात आला नाही. केवळ मोदी - मोदी करीत राहिले. विरोधी पक्षाच्या २०-२५ नेत्यांना एका व्यासपीठावर आणून काहीही होणार नाही. पुन्हा जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार आहे, हे ममता दीदींनी लक्षात घ्यावे. या देशातील १०० कोटी जनता पंतप्रधान मोदींसोबत आहे,' असा दावा त्यांनी केला.    Print


News - World | Posted : 2019-01-23


Related Photos