आय एस च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राज्य एटीएसने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून केली नऊ तरुणांची धरपकड


वृत्तसंस्था / औरंगाबाद :  'इस्लामिक स्टेट' या दहशवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राज्य एटीएसने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून मंगळवारी नऊ तरुणांची धरपकड केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दिलेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली. ऐन प्रजासत्ताक दिनाच्या चार दिवस आधी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आल्याने खळबळ उडाली असून या तरुणांकडून काही आक्षेपार्ह इस्लामिक साहित्य हस्तगत करण्यात आल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. 
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास यंत्रणा देशातील तरुणाच्या संशयास्पद हालचालींवर नजर ठेवून होती. यादरम्यान महाराष्ट्रातील काही तरुण त्यांच्या रडारवर आले. याबाबतची माहिती महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. एटीएसचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा आणि औरंगाबाद येथील काही तरुणांच्या हालचाली टिपत होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून वादग्रस्त पोस्ट टाकणे, विविध माध्यमांद्वारे देशाबाहेरील व्यक्तींशी संपर्क, इस्लामिक साहित्याचे वाचन अशा अनेक संशयास्पद हालचाली वाढल्याने एटीएसने कारवाईसाठी चार पथके तयार केली. मंगळवारी पहाटेपासून मुंब्रा आणि औरंगाबाद येथे छापे टाकण्यात आले. मुंब्रा कौसा येथील अमृत नगरमधून चार तर औरंगाबाद येथून पाच तरुणांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्व कोणाशी संपर्कात होते, हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. रात्री उशिरापर्यंत नऊपैकी कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. 
मुस्लिम आणि मागास लोकांच्या हक्कासाठी लढण्याचे कारण पुढे करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना करण्यात आली. देशभरात या संघटनेचे हजारो सदस्य आहेत. ताब्यात घेण्यात आलेले नऊ तरुण या संघटनेचे कार्यकर्ते असल्याचा संशय आहे. काही वर्षांपासून ते या संघटनेशी जोडलेले आहेत. देशविघातक कृत्य करण्यासाठी त्यांना भडकविण्यामागे संघटनेचा हात आहे का? याबाबतही चौकशी सुरू असल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्याने सांगितले.    Print


News - Rajy | Posted : 2019-01-23


Related Photos