महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विविध बियाण्यांची खरेदी करताना दक्षता घ्यावी


- बियाणे व रासायनिक खते सदोष आढळल्यास हेल्पलाइन

- क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : खरीप हंगाम सन २०२३ ला सुरुवात झाली असून, चंद्रपूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडून रासायनिक खताचे १ लक्ष ४३ हजार ८०० मे. टन आवटंन मंजूर झाले आहे. तसेच  विविध पिकांच्या उच्च गुणवत्तेची ५७ हजार ५१०.२१  क्विंटल बियाणे सार्वजनिक व परवानाधारक विक्री केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना मूलभूत उच्च गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा( बी-बियाणे व रासायनिक खते) मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीत उपलब्ध आहे.

खरीप हंगामात विविध बियाण्यांच्या खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी घ्यावयाची दक्षता : शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करत असताना पिशवीला टॅग असल्याची खात्री करून घ्यावी. बियाण्यांची एक्सपायरीची तारीख तपासून घ्यावी. विक्रेत्यांकडून बियाणे खरेदीची पक्की पावती म्हणजे बिल घ्यावे. दिलावर बियाण्यांचे पीक आणि वाण तसेच लॉट नंबर, बियाणे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करून घ्यावी. विकत घेतलेले बियाणे सदोष आढळल्यास तालुका कृषी अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार करावी. सदोष बियाण्यांची तक्रार करता येण्याच्यादृष्टीने पेरणी करतेवेळी पिशवीतून बियाणे टॅग असलेली बाजू सुरक्षित ठेवून खालील बाजूने फोडावी. बियाण्यांचा थोडा नमुना पिशवीमध्ये किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा जेणेकरून, तो तक्रार निवारण अधिकाऱ्यास सादर करता येईल.

खरीप हंगामात रासायनिक खतांचा समतोल : खरीप हंगामात रासायनिक खतांचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या जमिनीचे माती परीक्षण करून घेत शास्त्रीय दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या मुल घटकांच्या पूर्तीसाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करण्यात यावा. त्यादृष्टीने नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांची रासायनिक खते, युरिया, डीएपी, एनपीके, एमओपी आणि एसएसपी याव्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्य गटातील रासायनिक खते देखील बाजारात उपलब्ध आहेत. त्याचा देखील समतोल वापर करण्यात यावा. जमिनीचा पोत टिकविण्यासाठी रासायनिक खतासोबत शेणखतासह कंपोस्ट खताचा देखील वापर करावा.

बियाणे व रासायनिक खते सदोष आढळल्यास तसेच एमआरपी पेक्षा अधिक रकमेची मागणी केली असता तक्रार करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी निविष्ठा गुण नियंत्रण शाखेतील करपे यांच्या ९५६१०५४२२९ या व्हाट्सअप हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos