२९ जानेवारी पासून गडचिरोली येथे पहिल्यांदाच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा : २१ पासून नागपूर विभागातील खेळाडूंचे सराव शिबीर


-आदिवासी विकास विभागाची जय्यत तयारी ; १ हजार ७५७ खेळाडू होणार सहभागी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आदिवासी विकास विभागाचे राज्यस्तरीय क्रीडा संमेलन पहिल्यांदाच गडचिरोली येथे २९ ते ३१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेले आहे.  या क्रीडा संमेलनात राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील १ हजार ७५७ खेळाडू सहभागी होणार असून संमेलनाचे जय्यत तयारी सुरू आहे. सोमवार २१ जानेवारीला नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषिकेश मोडक गडचिरोली येथे प्रत्यक्ष भेट देणार असून स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. तसेच उद्यापासून नागपूर विभागातील खेळाडूंचे सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे . 
  गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर आयोजित केलेल्या या क्रीडा संमेलनात राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नाशिक, ठाणे, अमरावती, व नागपूर या चार विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील आदिवासी खेळाडू आपले कौशल्य दाखविणार आहेत. नाशिक विभागाचे ४३८, ठाणे विभागाचे ४१८ अमरावती विभागाचे ४८० व नागपूर विभागाचे ४२१ असे एकूण १ हजार ७५७ खेळाडू सहभागी होणार आहेत.
 नागपूर विभागाचे अपर आयुक्त ऋषिकेश मोडक  व सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्यातील पहिल्यांदाच होणाऱ्या या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जोरदार तयारी सुरु असून नागपूर विभागातील अधीकारी व कर्मचाऱ्याचा विविध समित्या गठीत झालेले आहेत. क्रीडा आयोजन , व्यवस्थापन , निवास, भोजन, मंच संचालन ,प्रसिद्धी, आरोग्य,  तक्रार निवारण, प्रमाणपत्र लेखन , साहित्य वाटप आदी समित्या अंतर्गत सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांना जबाबदारी नेमून दिले आहे. स्पर्धेच्या दृष्टीने सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. २२ जानेवारीला सकाळी १० वाजता सर्व समित्या सदस्यांची सभा गडचिरोली येथील सहायक आयुक्त सामाजिक न्याय कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेले आहे. 
गडचिरोली येथील प्रेक्षागार मैदानावर यापूर्वी नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा २८ तें २९ नोव्हेंबर , ३  ते ५ जानेवारी २०१२ तसेच २३ ते २५ डिसेंबर २०१७ या कालावधीत झालेल्या होत्या . पहिल्यांदाच राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचे आयोजन गडचिरोली येथे करण्यात येत असल्याने  उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे .  या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाची उत्सुकता लागलेली आहे . आश्रम शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर नावलौकिक करण्याची नामी संधी या क्रीडा समेळांच्या निमित्याने प्राप्त झालेली आहे . दऱ्या खोऱ्यात व दुर्गम - अतिदुर्गम भागात राहणारे आदिवासी विद्यार्थी राज्यस्तरावर आपले क्रीडा कौशल्य व प्रतिभा दाखविण्यासाठी आतुरलेले आहेत . या क्रीडा संमेलनाच्या निमित्याने सांस्कृतिक कलागुणांची उधळण तसेच आदिवासी संस्कृतीचे दर्शन देखील होणार आहे . 
नागपूर विभागातील खेळाडूंचे सराव शिबीर गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानावर सोमवार २१ जानेवारी पासून सुरु होत आहे . या मैदानावर कबड्डीच्या तीन , खो -खो तीन , व्हॉलीबॉल दोन व हॅन्डबॅलच्या एका मैदानाची आखणी केलेली असून सर्व शिबिरात नागपूर विभागातील गडचिरोली , अहेरी, भामरागड , चंद्रपूर , चिमूर भंडारा देवरी व नागपूर या आठ प्रकल्पातील ४२१ खेळाडू सहभागी होत आहेत. या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनात १४ , १७ व १९ वर्ष वयोगटातील मुला मुलींचे कबड्डी , खो - खो , व्हॉलीबॉल हँडबॉल या सांघिक खेळासह लांबउडी, उंचउडी , गोळाफेक , थाळीफेक , भालाफेक , धावणे आदी वयक्तिक खेळांचे आयोजन केलेले आहेत . 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-20


Related Photos