भावाच्या डोळ्यादेखत वाघाने केले बहिणीला ठार


- जोगापूर जंगलातील दुर्दैवी घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
अविनाश रामटेके / विरूर स्टेशन :
राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन जवळील खांबाडा - जोगापूर जंगलात झाडूच्या काड्या गोळा करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून  बळी घेतल्याची घटना आज १८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे. विशेष म्हणजे भावादेखत वाघाने महिलेवर हल्ला केला. यामुळे घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
वर्षा सत्यपाल तोडासे (३९) रा. खांबाळा असे मृतक महिलेचे नाव आहे. वर्षा तोडासे ही राजुरा वनपरीक्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक १७७ मध्ये आज दुपारच्या सुमारास झाडूच्या काड्या गोळा करण्यासाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा भाऊ मनोज शेडमाके, सासू अनुसया तोडासे सोबत होत्या. यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने वर्षा वर अचानक हल्ला केला. यावेळी मनोज शेडमाके आणि अनुसया तोडासे यांनी आरडाओरड करून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र वाघाने तिच्या नरडीचा घोट घेत जंगलात पळ काढला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. विरूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार अरविंद कतलाम व त्यांचे सहकारी तसेच तहसीलदार रविंद्र होळी हे सुध्दा घटनास्थळी दाखल झाले. वृत्त लिहिस्तोवर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. विरूर स्टेशन परिसरातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे परिसरात वाघाची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. 

 

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-18


Related Photos