महत्वाच्या बातम्या

 सुरक्षारक्षकांच्या वेतनात वाढ : १२ मंडळांसाठी वेतनवाढ लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी मुंबई : सुरक्षारक्षक मंडळातील नोंदीत रक्षकांच्या वेतन व भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील १२ मंडळांसाठी वेतनवाढ व लेव्हीच्या रकमेत वाढ जाहीर केली आहे.

या निर्णयाचा ५० हजारपेक्षा जास्त सुरक्षारक्षकांना लाभ होणार आहे. बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळासाठी १ हजार ३७५ रुपये वेतनवाढ व ६२२ रुपये लेव्ही असे १ हजार ९९७ रुपये वाढ केली आहे. रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळासाठी १ हजार ४०२ रुपये वेतनवाढ व ४६९ रुपये लेव्ही वाढविली आहे. प्रत्येक मंडळनिहाय वेतनवाढ लागू केली आहे.

सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढ व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनच्या सरचिटणीस नंदाताई माधवराव भोसले यांनी मार्चमध्ये उपोषण केले होते. माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये हा विषय मांडला होता. उपोषण व विधान परिषदेमध्ये उठविलेल्या आवाजाची दखल घेऊन शासनाने कामगारांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. याविषयीचा प्रस्ताव सहआयुक्तांनी (माथाडी) शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. शासनाने २ मे रोजी सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून याविषयी कामगार आयुक्तांना पत्राद्वारे कळविले आहे.

खासगी सुरक्षारक्षकांचेही वेतन वाढणार

बोर्डाच्या या निर्णयाच्या आधारावर खासगी सुरक्षारक्षक कंपन्यांमधील सुरक्षारक्षकांच्या वेतनामध्ये वाढ करणेही शक्य होणार आहे. यामुळे खासगी सुरक्षा कंपन्यांमधील ७ ते ८ लाख सुरक्षारक्षकांच्या वेतनवाढीचा मार्गही सुकर होणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos