नागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाण पूल टप्पा २ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर
: पूर्व-पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील  केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाण पूल  टप्पा 2 चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. या उड्डाण पुलामुळे नागपूरकर जनतेची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली असून  या पुलामुळे रेल्वे स्टेशन येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. रामझुला आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, डॉ.‍ मिलिंद माने, सुधाकर कोहळे, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जिल्हाधिकारी  अश्विन मुदगल, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, मुख्य अभियंता उल्हास देबाडवार, मुख्य अभियंता सुधाकर मुरारे, अधीक्षक अभियंता उज्ज्वल डाबे, मनोज मालेवार, माजी महापौर प्रवीण दटके आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पूर्वीच्या अस्तित्वातील 100 वर्ष जुन्या कमानी पुलाऐवजी नवीन 6 पदरी नवीन रेल्वे उड्डाण पूल बांधण्याच्या सुधारित प्रस्तावास रेल्वे विभागाने मंजुरी दिली त्यानुसार सुधारित प्रस्तावाप्रमाणे बांधकामासाठी  69.62 कोटी खर्च आला आहे. संत्रा मार्केट येथील 6 पदरी केबल स्टेड रेल्वे उड्डाण पुलाचे काम नागपूर शहर एकात्मिक योजनेत समाविष्ट असून रुपये 350 कोटी खर्चाची  योजना शासनाने बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर मंजूर केली होती.
नागपूर शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेच्या 517. 36 कोटी रकमेच्या सुधारित अंदाजपत्रकास शासनाने नुकतीच मंजुरी प्रदान केली आहे.जुना रेल्वे उड्डाण पूल तोडण्याचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूर्ण करण्यात आले. यात सुमारे 130 टन क्षमतेची क्रेन तसेच वायर सॉ यांचा उपयोग करून पुलाचा प्रत्येक भाग कापून वरचेवर क्रेनने काढण्यात आला. हे काम करताना खाली असणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.
अशा प्रकारचे केबल स्टेड उड्डाण पूल राज्यात दोन असून वांद्रे वरळी सागरी सेतू आणि संत्रा मार्केट उड्डाण पुलाचा समावेश आहे.  दोन्ही पूल रस्ते विकास महामंडळाने बांधले आहेत. या कामाचे कंत्राट मे ॲफकॉन्स इन्फ्रा. लि. मुंबई यांची असून मे. राईटस्‍ लि. नागपूर प्रकल्प सल्लागार व्यवस्थापक आहेत. पुलाची एकूण लांबी (पोचमार्गासह) 606.742 मीटर असून केबल स्टेड पुलाची लांबी 200 मीटर एवढी आहे. या कामाची सुधारित मंजूर किंमत 69.62 कोटी एवढी आहे.



  Print






News - Nagpur | Posted : 2019-01-18






Related Photos