८० टक्के व्यसनी क्लिनिकल समुपदेशनाने बरे होऊ शकतात : डॉ. सुधीर भावे


- गडचिरोलीत रुग्णांसाठी ‘व्यसन उपचार क्लिनिक’
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
दारूचे व्यसन असलेल्यांवर सामाजिक लांच्छन लागलेले असते. पणदारू पिण्याची कारणे पाहता ती ६० टक्के अनुवांशिक आणि ४० टक्के सामाजिक आहेत. ही अनुवांशिकता आपण मिटवू शकत नाही. दारू ही मद्यपीच्या हाती कमी मेंदूत जास्त असते. व्यसनाच्या आजाराची काही करणे व  लक्षणे आहेत. त्यामुळे वैद्यकीय व्याख्येत हा आजार पूर्णतः बसतो आणि आजार म्हटला की त्यावर इलाज असतोच. यातील २० टक्के व्यसनींनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते. ८० टक्के रुग्ण हे केवळ समुपदेशनानेच बरे होऊ शकतात. हे रुग्ण हे वाईट नसून कमजोर असतात. त्यांना आधाराची गरज असते. डॉक्टरसमोर ते बरेचदा प्रांजळपणे सर्व कबुल करतात. त्यामुळे सर्वच डॉक्टरांची व्यसन उपचारात महत्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटल मधील मानसरोग विभाग प्रमुख मानसोपचारतज्ञ डॉ. सुधीर भावे यांनी केले.
सर्च द्वारे मुक्तिपथ अंतर्गत गडचिरोली येथे पहिले व्यसन उपचार क्लिनिक मुक्तिपथ तालुका कार्यालयात बुधवार १६ जानेवारीपासून सुरू झाले. डॉ. सुधीर भावे यांच्या हस्ते या क्लिनिकचे उद्घाटन झाले. व्यसनी रुग्णांना या आजारातून बाहेर काढण्यात डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांची महत्वाची भूमिका लक्षात घेत जिल्ह्यातील डॉक्टर्स, औषध विक्रेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत ‘संवाद बैठक’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मद्यपान हा रोग आणि त्यावर आवश्यक असलेला इलाज याविषयी  मार्गदर्शनात डॉ. भावे यांनी या आजाराची जीवशास्त्रीय मांडणी केली. यासाठी आजवर झालेल्या अनेक संशोधनाचे दाखलेही त्यांनी दिले. बैठकीला मार्गदर्शक म्हणून सर्च चे संस्थापक संचालक डॉ. अभय बंग, संचालिका डॉ. राणी बंग, केमिस्ट एन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुनघाटे, केमिस्ट एन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अद्वैत अप्पलवार, सचिव डॉ दीपक वैद्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सुशील गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.रुडे यावेळी म्हणाले, अनेक चांगल्या घराची मुले दारूच्या आहारी जात असल्याचे आज बघत आहो. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी सर्च आणि मुक्तिपथ द्वारे सुरू असलेल्या अभियानात आम्ही सहभागी आहोत. या उपचार केंद्राद्वारे हे अभियान आणखी बळकट होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. मुनघाटे म्हणाले, व्यसनाने जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुलांमध्ये नपुंसकत्वाचे प्रमाण तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे आजार वाढत आहेत. या आजारांवर औषध देता येईल. पण खर्रा, दारू पिणेच बंद होईल असे ठोस औषध नाही. त्या दृष्टीने व्यसन उपचार क्लिनिक मोलाचे ठरेल असे ते म्हणाले.डॉ. सुशील गावंडे म्हणाले, सर्वप्रथम व्यसन हा एक मानसिक आजार आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. पण बाकी आजाराप्रमाणे मानसिक आजार हे केवळ औषधांनी बरे होत नाही. त्यावर समुपदेशन आवश्यक असते. बराच काळ जाऊ द्यावा लागतो. यात कुटुंबाची भूमिका खूप महत्वाची असून व्यसनी वरील अपेक्षांचे ओझे आधी खाली करा अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. सर्च येथील व्यसन उपचार शिबिरात येऊन व्यसनमुक्त झालेले लाखांदूर येथील विलास नाकतोडे आणि आरमोरी येथील प्रमोद शेंडे यांनी अनुभव कथन केले. व्यसनी असताना घरच्यांना होणारा त्रास, अवहेलना आणि व्यसनमुक्त झाल्यावर आनंदी असणारे कुटुंब याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. मुक्तिपथ प्रकल्पाचे संचालक डॉ. मयूर गुप्त म्हणाले, लोकांना व्यसनमुक्त करण्यासाठी उभारलेला मुक्तिपथ हा प्रकल्प जगासाठी एक मॉडेल आहे. त्यामुळे आमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. यासाठी सर्वांची साथ हवी असल्याचे ते म्हणाले. सर्व डॉक्टरांनी दवाखान्यात आणि औषध विक्रेत्यांनी मेडिकलमध्ये लावणे आवश्यक असलेल्या माहिती फलकाची आणि औषध चिठ्ठीवर मारावयाच्या शिक्क्याची माहिती त्यांनी दिली. मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी संचालन  केले. मानसिक आरोग्य विभागातील मानसोपचार तज्ञ डॉ. आरती बंग,सर्च चे उपसंचालक तुषार खोरगडे आणि मुक्तिपथ चमूने या कार्यक्रमाचे नियोजन केले. संवाद बैठकीला वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

‘व्यसन उपचार क्लिनिक’ रुग्णांसाठी मैलाचा दगड ठरेल : डॉ अभय बंग 

दारू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन हा गडचिरोलीसह संपूर्ण जगात आरोग्याच्या समस्या आणि गरिबी निर्माण करणारा प्रश्न झाला आहे. दरवर्षी जगात होणाऱ्या ग्लोबल बर्डन ऑफ डीसेस या अध्ययनात, प्रमुख रोगांमागेदारू आणि तंबाखू सेवन ही दोन प्रमुख करणे असल्याचे सातत्याने सांगितले जात आहे, आणि या दोन्ही पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण गडचिरोलीत जास्त होते. यावर जिल्ह्यात दारूबंदी हा शासकीय उपाय, सर्च मध्ये व्यसन उपचार केंद्र आणि मुक्तिपथ द्वारे जनजागृती हे मार्ग आम्ही शोधले.या तीनही उपायांचे चांगले परिणाम जिल्ह्यात दिसत आहेत. दारू पिणाऱ्यांची संख्याही घटली. पण ज्यांना दारू सोडणेच अशक्य वाटते अशांना वैद्यकीय उपचार आणि समुपदेशनाची गरज आहे. ही गरज गडचिरोली शहरातील व्यसन उपचार क्लिनिकद्वारे पूर्ण होईल. त्यामुळे हे क्लिनिक व्यसनी रुग्णांसाठी मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केला.

उपचाराच्या कक्षा रूंदावतील :  डॉ. राणी बंग

दारूमुक्ती आंदोलनाच्या वेळी दारू विकणाऱ्या बरोबरच पिणाराही गुन्हेगार अशी चुकीची भूमिका आम्ही सुरुवातीलाघेतली होती. पण डॉ. अनिल अवचट यांनी आमच्या लक्षात आणून दिले की दारू विकणारा गुन्हेगार आहे, पिणारा नाही.त्यांची ही भूमिका आणि दारूचे व्यसन असलेल्या आमच्याच काही कार्यकर्त्यांच्या अनुभवातून आमच्या लक्षात आले ही माणसे व्यसनाचे रुग्ण आहेत. हा मानसिक आजार असून त्याची परिणती शारीरिक आजारांमध्ये होते. ही माणसे कुटुंबवत्सल असतात. त्यामुळे या आजारावर उपचार आवश्यक आहे. त्या दृष्टीने सर्च मध्ये आम्ही सुरु केलेल्या व्यसन उपचार विभागा अंतर्गतआज सुरू झालेल्या क्लिनिकद्वारे उपचाराच्या कक्षा नक्कीच रूंदावतील. कारण एका व्यसनीच्या उपचारातून पूर्ण कुटुंबाचा इलाज होतो. त्यामुळे हा एक कौटुंबिक दवाखाना असल्याचे डॉ. राणी बंग यावेळी म्हणाल्या.   Print


News - | Posted : 2019-01-17


Related Photos