महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाघासारखा पराक्रम करावा लागेल : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन


- पोलीस मुख्यालयात ६३ वा महाराष्ट्र दिन साजरा
-  चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात योगदान देण्याचे ना.मुनगंटीवार यांचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जगातील १९३ देशांपैकी १४ देशांमध्ये वाघ आहेत. त्यातील ६५ टक्के वाघ भारतात आहेत. पण संपूर्ण जगात सर्वाधिक वाघ असलेला चंद्रपूर हा एकमेव जिल्हा आहे. ही आनंदाची बाब आहेच, पण आता महाराष्ट्राच्या विकासासाठी वाघासारखा पराक्रम गाजविण्याची जबाबदारी देखील चंद्रपूर जिल्ह्यावर आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


पोलीस मुख्यालय येथे ६३ व्या महाराष्ट्र दिनानिमीत्त आयोजित ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. झेंडावंदन व परेडचे निरीक्षण झाल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, डॉ. मंगेश गुलवाडे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक रिना जनबंधू, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.


सुरुवातीला महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा मुनगंटीवार यांनी दिल्या. ते म्हणाले, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा… या महाराष्ट्र गितातील ओळींप्रमाणे जबाबदारी पूर्ण करण्याचा संकल्प सोडणे म्हणजे महाराष्ट्र दिन साजरा करणे होय. महाराष्ट्राच्या भूमीतील छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी देशाच्या प्रगतीमध्ये मोठी जबाबदारी पार पाडली. पण त्यांचे फक्त स्मरण करून होणार नाही. त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी लागेल.’ संविधानातील नागरिकांच्या कर्तव्यांची त्यांनी आठवण करून दिली. संविधानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागरिकांची कर्तव्ये देखील नमूद केलेली आहेत. दुर्दैवाने आज देशात ते संविधानातील मूलभूत कर्तव्य वाचणाऱ्यांची संख्या कमी आहे. चंद्रपूरकरांनी ही जबाबदारी पार पाडणे हाच खरा महाराष्ट्र दिनाचा संकल्प ठरेल, असे मुनगंटीवार म्हणाले.
येत्या पाच वर्षांत शेतीच्या संदर्भातील योजनांमध्ये चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहील असा विश्वास ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ग्रामीण व शहरातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी हर घर जल या माध्यमातून १ हजार ३०२ योजनांना परवानगी दिली, असेही ते म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेत पूर्वी १ लाख ५० हजार रुपयांपर्यंतच अनुदान मिळायचे. आता ते ५ लाख रुपये करण्यात आले. तसेच निराधार, परितक्त्या यांचे अनुदान १५०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे यंदा ३५० वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने हा उत्सव भामरागड ते रायगड मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.
दरम्यान, रेडक्रॉस सोसायटीद्वारे तयार करण्यात आलेल्या मोबाईल टेस्टिंग व्हॅनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केले. गावपातळीवर महिला सक्षमीकरणाच्या कामात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तर जिल्हा स्तरावर आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.


महाराष्ट्राला अभिमान
राज्याचा अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर देशाच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा रेव्हेन्यू सरप्लस ११ हजार ७५ कोटी केला. आज देशाच्या जीडीपीमध्ये सुद्धा महाराष्ट्राचे योगदान १५ टक्के आहे. चंद्रपूरचा नागरिक म्हणून मला याचा अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


चंद्रपूरच्या विकासाची २०५ कामे
चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी २०५ कामांचे नियोजन केले. वन अकादमी, बॉटनिकल गार्डन, सैनिक शाळा यासोबत आता टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचे काम सुरू आहे. टाटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी ९० गावे दत्तक घेऊन कृषी उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘मिशन जय किसान’ या योजनेतून शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचा संकल्प केला आहे, असेही ते म्हणाले.


अडिच लाख शेतकऱ्यांना लाभ
नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा चंद्रपूर जिल्ह्यातील अडिच लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. स्व. गोपिनाथ मुंडे पिक विमा योजनेतील सानुग्रह अनुदान २ लाख रुपये करण्यात आला असून २०१८ पासून १० कोटी २९ लाख शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. फक्त १ रुपयांत पिक विमा योजना आणल्याचेही ते म्हणाले.


अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्र
राज्यातील उत्तम आरोग्य सेवा चंद्रपुरात मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची उभारल्या जात आहेत. १४ नवीन इमारतींचे काम झाले असून इतर इमारतींचे लवकरच पूर्णत्वास येईल. जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देत अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र अस्तित्वात येतील, असा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली. यासोबतच आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या योजनेअंतर्गत १५ हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि नागरी आरोग्य केंद्र आजपासून नागरिकांच्या सेवेत येत असल्याचे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.





  Print






News - Chandrapur




Related Photos