गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर यांनी केले सन्मानित


- दुर्गम पोलीस ठाण्यांना दिल्या भेटी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
  जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती देऊन त्यांना सन्मानित केले. हे सर्व कर्मचारी नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सी-६० पथकात कार्यरत आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर यांनी मंगळवारी पोलिसांचा गौरव केला. त्यांनी जिल्ह्यातील दुर्गम भागातील पोलीस मदत केंद्रांना भेटी दिल्या. 
एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या कसनासूरमधील पोलीस-नक्षल चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षलवादी मारले गेले होते. पोलिसांना मिळालेल्या त्या अभूतपूर्व यशासाठी सी-६० पथकाच्या ३५ लोकांना वेगवर्धित पदोन्नती देण्याची शिफारस पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांच्या अध्यक्षतेखालील आणि उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा समावेश असलेल्या समितीने महासंचालकांकडे केली होती. त्याला मंजुरी देत महासंचालक पडसलगिकर यांनी त्या कर्मचाऱ्यांना गडचिरोली येथे सन्मानित केले.
दोन अधिकाऱ्यांना स्टार लावून तर ३३ कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप केले. यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना हेसुद्धा उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यातील सी-६० पथक हे नक्षलविरोधी अभियानातील देशातील उत्कृष्ट पथक असून या पथकाने आपली प्रतिमा भविष्यातही कायम ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.  सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर आलेल्या महासंचालकांनी सपत्निक शहीद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. शहीद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या समस्यांवरही त्यांनी चर्चा केली. 
पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर, अतिरिक्त महासंचालक संजय सक्सेना इतर अधिकाºयांनी मंगळवारी नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या हेडरी पोलीस ठाण्याला भेट दिली. तेथील जवान कशा स्थितीत राहतात, कसे काम करतात याची माहिती जाणून घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणीही त्यांना जाणून घेतल्या.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-16


Related Photos