धोकादायक नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाई करा


- पक्षीमित्रांची  मागणी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
अजय कुकडकर / गडचिरोली :
  धोकादायक नायलॉन मांज्यामुळे पक्षांसोबतच मानवाला सुद्धा इजा झाल्याच्या तसेच मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तरीही नॉयलॉन मांज्याचा वापर सर्रास सुरूच आहे.  मकर संक्रांतीच्या पर्वावर पतंग उडविण्याची परंपरा असून, हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, पतंग उडविताना नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची सर्रास विक्री व वापर होत असून, नायलॉन मांजाची  विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाई  कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षमित्रांमधून केली जात आहे.
घातक मांजामुळे अनेक पक्षी, पशू व माणसांना प्राण गमवावे लागले आहेत. नायलॉन, चायनीज मांजाच्या व्यापार, साठवणूक, विक्री व वापरावर सरसकट बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ११ जुलै २०१७ ला राष्ट्रीय हरित लवादाने (National Green Tribunal) दिला आहे. मात्र अजूनही या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने ‘पर्यावरण (संवर्धन) कायदा सेक्‍शन’अंतर्गत नायलॉन, चायनीज मांजावर बंदी घालणारे परिपत्रक पारित केले होते. मात्र, या मार्गदर्शक तत्त्वांना कुठलाही कायदेशीर आधार नसल्यामुळे वनविभाग व पोलिस यंत्रणा यांना कारवाई करताना अडचण येत  होती.  त्यामुळेच मांजाचे व्यापारी व वापरकर्ते यांच्याकडून या परिपत्रकाला सर्रास हरताळ फासला जात होता. मात्र, राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयाच्या आधारे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, वन विभाग अधिकारी यांना बेकायदेशीर नायलॉन मांजा उत्पादन, साठवणूक, विक्री व वापर रोखता येईल व फौजदारी गुन्हे  दाखल करता येतील, अशी मानसिकता दाखवावी लागेल.
नायलॉन मांजामुळे पक्षी, पशू आणि माणसंही दगावल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे त्यावर बंदीचा निर्णय झाला. मात्र, त्याची अंमलबजावणी कठोरपणे होताना दिसत नाही. अधिकाऱ्यांनी या मांजाच्या विक्री व वापराविरुद्ध थेट गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली जात आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-15


Related Photos