तब्बल ४० सुवर्णपदके पटकाविलेल्या सुवर्णकन्या एंजल देवकुलेचा होणार दिल्लीत सन्मान


- राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार जाहिर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जगातील सर्वात कमी वयाची मार्शल आर्ट पटू म्हणून ओळख मिळविणारी तसेच जगभरात विविध स्पर्धा गाजवून ४० सुवर्णपदके पटकाविलेली गडचिरोलीची सुवर्ण कन्या एंजल विजय देवकुले हिची क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या २४ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनातील दरबार हाॅलमध्ये आयोजित पुरस्कार वितरण समारंभात एंजल चा गौरव केला जाणार आहे. यामुळे एंजलने गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
एंजल चा जन्म ८ मे २००८ रोजी झाला. ती स्कूल ऑफ स्काॅलरची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आहे. तिच्या खेळाने तिने ग्रॅंडमास्टर म्हणून ओळख निर्माण केली आहे.  तिने साऊथ कोरियामध्ये पार पडलेल्या तिसर्या जागतिक स्काॅय मार्शल आर्ट स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकाविले आहे. गडचिरोली जिल्हा प्रशासनाने एंजलला गोवर आणि रूबेला लसिकरणासाठी ब्रॅंड  ॲम्बेसिडर घोषित केले आहे.
राष्ट्रीय स्तरावर नाविण्य, समाजसेवा, शैक्षणिक, क्रीडा, कला आणि संस्कृती, शौर्य अशा पाच विभागात राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. क्रीडा क्षेत्रातून असंख्य खेळाडूंमधून  एंजलची निवड करण्यात आली आहे. एक लाख रूपये, दहा हजारांचे बुक वाउचर, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी एंजल देवकुले २२ जानेवारीला दिल्लीत पोहचणार आहे. २३ जानेवारी रोजी तालिम होणार असून २४ जानेवारीला पुरस्कार वितरण समारंभ आहे. २६ जानेवारी रोजी राजपथवर होत असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सुध्दा एंजल सहभागी होणार आहे. 
प्रशिक्षक संदीप पेदापल्ली आणि आई स्वाती देवकुले, वडील विजय देवकुले यांच्या मार्गदर्शनात एंजलने आतापर्यंत तब्बल ४० सुवर्णपदके पटकाविले आहेत. तसेच १२ विविध विक्रम तिने आपल्या नावावर नोंदविले आहेत.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-15


Related Photos