अभ्यास दौऱ्यातून गडचिरोलीतील गिधाड मित्रांनी जाणून घेतली गिधाड संवर्धनाविषयी माहिती


- हरीयाणा राज्यातील पिंजोर येथील गिधाड संरक्षण व प्रजनन केंद्रास दिली भेट 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर  प्रतिनिधी / गडचिरोली :
निसर्गाचे स्वच्छतादूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिधाड पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी गडचिरोली वनविभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी जिल्ह्यात २१ गिधाड मित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. या गिधाड मित्रांना गिधाड पक्ष्याच्या संवर्धनाविषयी माहिती मिळावी या उद्देशाने हरीयाणा राज्यातील बाॅम्बे नेचर हिस्ट्री सोसायटी व हरीयाणा वनविभागाच्या वतीने सुरू असलेल्या पिंजोर येथील गिधाड संरक्षण व प्रजनन केद्रात अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्यादरम्यान गिधाड मित्रांनी गिधाड संवर्धनाविषयी माहिती जाणून घेतली.
गडचिरोली जिल्ह्यातील गिधाड मित्रांसाठी ७  ते ११ जानेवारी दरम्यान हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यात १० गिधाड मित्र आणि ४ वनाधिकारी सहभागी झाले होते. गिधाड संरक्षण व प्रजनन केंद्रात चार दिवस प्रशिक्षण देण्यात आले. गिधाड संरक्षण व प्रजनन  केंद्राचे प्रकल्प प्रमुख डाॅ. विभू प्रकाश  यांनी गिधाडमित्रांना विविध विषयांवर माहिती दिली. गिधाडांची प्रजाती कशी ओळखावी, गिधाडांची अंडी कृत्रीमरित्या उबविण्याबाबत प्रात्याक्षिक देण्यात आले. देशात गिधाड पक्ष्यांच्या प्रजाती किती याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर प्रत्यक्ष प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. जखमी गिधाड पक्ष्यांना पकडण्याची पध्दती, रिंग आणि मायक्रोचिप बसविण्याविषयी तसेच  रोड ट्रान्सेक्ट मेथड द्वारे गिधाडांची संख्या मोजण्याविषयी माहिती देण्यात आली. डायक्लोफेनेक औषधी जनावरांना दिली जाते. या औषधीमुळे गिधाडांचा मृत्यू होतो. यामुळे या औषधीचा वापर टाळण्याबाबत जनजागृती कशी करावी, लिव्हर सॅम्पल कशा प्रकारे करावे, याबाबत माहिती देण्यात आली. प्रकल्पातील निकिता प्रकाश , विशाल वर्मा, मेघा रसायली, हेमंत बाजपयी आदींनी प्रशिक्षण दिले.   
गडचिरोली येथील गिधाड मित्र व वनाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या गिधाड संवर्धनाबद्दल माहिती दिली. माहिती जाणून घेतल्यानंतर बिएचएनएस संस्थेच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली वनविभागाचे कौतुक केले. या अभ्यास दौऱ्यातून गडचिरोलीतील गिधाड मित्रांना गिधाडांच्या संवर्धनाबाबत सखोल माहिती मिळाली. या माध्यमातून जिल्ह्यात गिधाड संवर्धन करण्यासाठी गिधाड मित्रांमध्ये उत्साह संचारला असून यापुढे आणखी चांगल्या प्रकारे गिधाड पक्ष्यांचे संवर्धन केले जाईल, असा विश्वास गडचिरोली वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांनी व्यक्त केला आहे.
या अभ्यास दौऱ्यात सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, गिधाड नोडल अधिकारी वनपाल मोतिराम चौधरी , वनपाल विशाल सालकर, वनरक्षक महेश तलमले, वनरक्षक भास्कर ढोणे, गिधाड मित्र दिनकर दुधबळे, अजय कुकडकर, दिलीप भांडेकर, सुभाष मेडपल्लीवार, काशिनाथ दुधबावरे , राहुल कापकर, पंकज फरकाडे, अनिल गेडाम, रूपेश चुधरी, मनोहर पिपरे आदी सहभागी झाले होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-15


Related Photos