गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद मिटविण्यासोबतच रोजगार निर्मितीसाठी पोलिस विभागाचे पाऊल


- सुरजागड येथे लवकरच होणार पोलिस मदत केंद्र 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: नक्षलग्रस्त व अतिमागास जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसण्यासाठी जिल्ह्यात उद्योग उभारणी व या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार देणे हे महत्वाचे पाऊल आहे. यासाठी पोलिस विभाग कसोशिने प्रयत्न करीत असून नक्षलवाद मिटविण्यासोबतच रोजगार निर्मितीसाठी पोलिस विभागाने महत्वपूर्ण भूमिका घेतली आहे. यामुळे अतिदुर्गम भागात पोलिस मदत केंद्रांची निर्मिती करून सुरजागड सारख्या ठिकाणी पोलिस संरक्षण देवून काम सुरू ठेवले आहे.
सुरजागड येथे लाॅयड मेटल अँड एनर्जी या कंपनीच्या वतीने उत्खनन सुरू आहे. या ठिकाणी मागील वर्षी नक्षल्यांनी ८० हून अधिक वाहनांची जाळपोळ केली होती. यानंतर या ठिकाणी पोलिस विभागाने लक्ष केंद्रीत करून सुरक्षा पुरविली. यामुळे येथे तब्बल दीड ते २  हजार मजूर काम करीत आहेत. त्यांच्या हाताला काम मिळाले आहे. मात्र या मजूरांना सध्या महिन्यातून केवळ दहा दिवस काम मिळत आहे. या मजूरांना आणखी जास्त काम मिळावे, अधिक संरक्षण मिळावे यासाठी पोलिस विभागाने सुरजागड येथे पोलिस मदत केंद्र निर्मितीचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून वनजमिनीची आणि निधीची तरतूदही करण्यात आली आहे. यामुळे लवकरच या ठिकाणी पोलिस मदत केंद्र उभे राहणार आहे. 
यासोबत लकवरच कोनसरी येथील लोहप्रकल्प उभा रहावा याकरीता पोलिस प्रशासन पुढाकार घेत आहे. सुरजागड येथून सध्या पाहिजे त्या प्रमाणात खनीजाचे उत्खनन होत नाही. यामुळे लवकरात लवकर पोलिस मदत केंद्र निर्माण होणे गरजेचे आहे. उत्खनन वाढविण्यासाठी सबंधित कंपनी प्रयत्न करीत आहे. याकरीता पोलिस प्रशासनाकडून पुरेपूर सुरक्षा पुरविणे गरजेचे आहे. उत्खनन वाढल्यास लोहप्रकल्प सुध्दा लवकरच सुरू होण्याची आशा आहे. आगामी पोलिस भरतीत स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देत केवळ जिल्ह्यातील युवकांसाठी भरती घेण्याचे जाहिर केले आहे. यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होवून मनुष्यबळाची निर्मिती होणार आहे. पोलिस विभागाने नक्षलवाद  मिटविण्यासोबतच अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. दुर्गम भागातील नागरीकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. जिल्ह्यातील युवकांच्या अंगी असलेले क्रीडा गुण, लोककला, आदिवासी संस्कृती जपण्याचे काम पोलिस विभागाद्वारे केले जात आहेत. या माध्यमातून अनेक युवकांमध्ये नवीन काही करण्याचे धाडस निर्माण झाले आहे. पुढेही पोलिस विभागाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासात योगदान देणाऱ्या उद्योग निर्मितीसाठी पाहिजे त्या प्रमाणात संरक्षण देणे गरजेचे आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-15


Related Photos