महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळपिकांसाठी पीक कर्जाचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


-  ३५ हजार ते १.४० लाखापर्यंत कर्ज सुविधा

-  शेतकऱ्यांनी फळपिकांकडे वळण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : पारंपारिक पिकांसोबतच भाजीपाला, फुलपिके, फळपिके व चारापिकांसाठीही पिककर्ज दिले जाते. शेतकऱ्यांनी या पिकांसाठी देखील पिककर्जाचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतात हमखास पिक देणाऱ्या या पिकांची लागवड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामात ७१ हजार शेतकऱ्यांना ९५३ कोटी रुपयाच्या पिककर्जाचे वाटप करण्यात आले होत. यावर्षी १ हजार २०० कोटी रुपये पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून त्यातील ९०० कोटी रुपये खरीप तर ३०० कोटी रुपये रब्बी हंगामासाठी वाटपाचे नियोजन आहे. पिककर्ज पारंपारिक कापूस, सोयाबिन, तूर, मुंग, उडिद, भूइमुंग, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसोबतच भाजीपाला, फुलपिके, फळपिके व चारापिकांसाठी देखील दिल्या जाते. शेतकऱ्यांनी या कर्जाचा लाभ घेऊन या पिकांखालील क्षेत्र वाढविणे आवश्यक आहे.

भाजीपाला, फुलपिके, फळपिके व चारापिकांसाठी हेक्टरी पिककर्जाचे दर नुकतेच निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार भाजीपाला पिकांमध्ये मिरचीसाठी प्रति हेक्टर ७५ हजार, टोमॅटो ८० हजार, खरीप कांदा ६५ हजार, रब्बी कांदा ८० हजार, बटाटा ७५ हजार, हळद व अद्रक १ लाख १० हजार, कोबीवर्गीय पिके ४२ हजार तर लसून पिकासाठी प्रति हेक्टर ५६ हजार २०० रुपये पिककर्जाचे दर निश्चित करण्यात आले आहे. फुलपिकांसाठी ॲस्ट्रर ३६ हजार, शेवंती ३६ हजार ४००, झेंडू ४१ हजार, गुलाब ४७ हजार, चमेली ३५ हजार ६००, मोगरा ४२ हजार, निशिगंधा ३८ हजार असा हेक्टरी पिककर्जाचा दर आहे.

फळपिकांसाठी चिक्कू या पिकाकरीता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ७० हजार रुपये इतके पिककर्ज मिळू शकते. पेरुसाठी ६६ हजार, कागदी निंबू ७० हजार, सिताफळ ५५ हजार, केळी १ लाख, टिश्यूकल्चर केळी १ लाख ४० हजार, संत्रा व मोसंबी ८८ हजार, हापूस आंबा १ लाख ५५ हजार, बोर व आवळा ४० हजार तर पपई पिकासाठी ८० हजार रुपये पिककर्जाची मर्यादा आहे. विविध चारापिकांसाठी देखील १६ हजार ते ७० हजारापर्यंत पिककर्ज उपलब्ध होऊ शकते.

शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांसोबतच हमखास उत्पन्न देणाऱ्या फळे, फुले व चारापिकांकडे वळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात या पिकांखालील क्षेत्र वाढविण्यासाठी पिककर्जाचे दर देखील चांगले ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या काही क्षेत्रावर या पिकांची देखील लागवड करावी. हळूहळू या पिकांचे क्षेत्र वाढवत जाऊन पारंपारिक आणि खर्चिक पिकांना चांगला पर्याय उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos