महत्वाच्या बातम्या

 खरीप हंगामात बोगस बियाणे, खतांची टंचाई याकडे लक्ष द्या : कृषीमंत्री अब्दुल सत्तार


- विभागीय खरीप हंगामपुर्व आढावा बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम अतिशय महत्वाचा असतो. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कुठेही बोगस बियाणे विकले जाणार नाही. बि-बियाणे रासायनिक खते यांची टंचाई भासणार नाही. कृषि निविष्ठांचा शेतकऱ्यांना सुरळीत पुरवठा होईल यासाठी विभागांनी दक्ष राहून काम करावे, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

वनामती येथे कृषिमंत्र्यांनी नागपूर विभागाचा खरीप हंगामपुर्व आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिना, गोंदीया जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, वनामतीच्या संचालक मित्ताली सेठी, नागपुर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, वर्धाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खतांचे आवंटन करण्यात आले आहे. सुरळीतपणे त्यांच्या बांधापर्यंत बियाणे, खते व अन्य निविष्ठा पोहोचल्या पाहिजे. कुठेही यात गैरव्यवहार होणार नाही, याची दक्षता घ्या. उगवनक्षमता तपासल्याशिवाय बियाण्यांचा वापर केला जावू नये. बियाणे उत्तमदर्जाचे आणि आणि खात्रीलायक असावे. कृषी विभागाने आपली भरारी पथके निविष्ठांच्या गुणनियंत्रणासाठी कामी लावावीत. शेतकऱ्यांच्या कुठेही तक्रारी येणार नाहीत, त्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्या. तक्रारी आल्यास त्याची तत्काळ देखल घेऊन कारवाई करण्याचे निर्देश सत्तार यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जातात. या योजना खऱ्या अर्थाने पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामासाठी पुढाकार घेतल्यास नागपूर विभागातील जिल्ह्यांत मोठे काम होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. एकापेक्षा जास्त पिके त्यांनी घ्यावीत यासाठी देखील शासन प्रयत्न करत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगल्यापैकी सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता आहे. या पाण्याचा उपयोग एकापेक्षा जास्त पिके घेण्यासाठी कसा करता येईल, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

पारंपारिक पिकांसोबतच शेतकऱ्यांनी भाजीपाला व फळपिकेही घेतली पाहिजेत. यासाठी हेक्टरी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या पिकांसाठी पीककर्ज देखील दिले जाते. शेतकऱ्यांना या पिकांसाठी प्रोत्साहित करा. या खरीप हंगामात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध झाले पाहिजे. शेतकऱ्यांनी कर्जासाठी अडवणूक होता कामा नये. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पीककर्ज वाटपाचा आढावा घ्यावा. कमी वाटप असलेल्या बॅकांना वाटप वाढविण्यासाठी सूचना केल्या जाव्या, अशा सूचना मंत्री सत्तार यांनी केले.

प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी जिल्हानिहाय खरीप नियोजनाची माहिती जाणून घेतली. खरीपासोबतच रब्बीचेही क्षेत्र वाढले पाहिजे. तेलबिया कमी पाण्यात येणारे पिक आहे. त्यामुळे या पिकांचे उत्पादन रब्बी हंगामात वाढविण्यास चांगली संधी आहे. शेतकऱ्यांना या पिकांसाठी प्रोत्साहित करा. गावोगावी बीज प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवा. बीबीएफचे क्षेत्र आणि नॅनो युरियाचा वापर वाढण्याच्या सुचना डवले यांनी केल्या. विभागीय कृषि सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी विभागाच्या नियोजनाची माहिती सादर केली. तत्पुर्वी सहाही जिल्ह्यांच्या जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी आपआपल्या जिल्ह्यांचे खरीप हंगामाचे नियोजन बैठकीत सादर केले.

विभागात १७ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन

विभागातील जिल्ह्यांमध्ये ज्वारी, भात, मका, तूर, मूग, उडीद, तिळ, भुईमुंग, कापुस या पिकांचे १७ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी २ लाख ३८ हजार क्विंटल बियाण्यांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. विभागात सोयाबिनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असते. यावर्षी ३ लाख हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन आहे. यासाठी 2 लाख 24 हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी बिजोत्पादन कार्यक्रमातून १ लाख ८० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

६ लाख मेट्रीक टन खताचे आवंटन

खरीप हंगामात विभागातील सहा जिल्ह्यांना विविध पिकांसाठी विविध प्रकारच्या ६ लाख ८ हजार पिकांचे आवंटन मंजूर झाले आहे. जिल्ह्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे खते वेळेत उपलब्ध होणार आहे. पारंपारीक युरीयासोबत शेतकऱ्यांनी नॅनो युरीयाचा वापर करावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. यावर्षी विभागात नॅनो युरीयाच्या ६ लाख बॅाटलचे आवंटन मंजूर झाले आहे.

निविष्ठा गुणनियंत्रणासाठी ७० भरारी पथके

शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे प्रमाणित बियाणे व अन्य निविष्ठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. या निविष्ठांची गुणवत्ता तपासण्यासाठी विभागात ७० भरारी पथके तयार करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी तर तालुकास्तरीय पथकांचे प्रमुख तालुका कृषि अधिकारी आहेत.





  Print






News - Nagpur




Related Photos