शेतकऱ्यांच्या उत्पादित कृषी मालाला थेट ग्राहकांचा उदंड प्रतिसाद : ब्लॅक राईस, पार्वती सूत तांदळाला ग्राहकांची पहिली पसंती


-फळे, भाजीपाला व विविध कृषीमाल नागपूरकरांसाठी उपलब्ध
-१६ जानेवारीपर्यंत चालणार कृषी महोत्सव
-पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात महोत्सवाचे आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर  :
शेतकऱ्यांकडून उत्पादीत कृषी उत्पादने थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देत शेतकरी व ग्राहक यांच्यातील साखळी थेट वृद्धिंगत करुन देण्याचे काम कृषी महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या उत्पादित कृषी मालाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
 आजपासून कृषी विद्यापीठ परिसरात जिल्हा कृषी महोत्सव सुरु झाला असून, या ठिकाणी शेतमाल प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हा महोत्सव बुधवार दि. १६ जानेवारीपर्यंत चालणार असून, उद्घाटनाच्या दिवशी नागपूरकरांनी उदंड प्रतिसाद देत कृषीमालाची खरेदी केली. भरपूर पोषणतत्त्व आणि राज्यात प्रथमच पिकविण्यात आलेल्या ब्लॅक राईसला ग्राहकांनी प्रथम पसंती दिली आहे.
 या ठिकाणी कृषी उत्पादित मालासोबतच गृहोद्योग आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून कृषीउत्पादनावर प्रक्रिया करुन विविध प्रकारच्या चटणी, लोणचे, फळांचे मुरब्बे, पापड, कुरड्या, फळे, भाजीपाला, मध, पपई, विविध वाणांचा तांदूळ, गहू, हरभरा, बटाटे, संत्री, मोसंबी यासह अनेकविध प्रकारच्या कृषी उत्पादनांचे २०० वर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दुग्धव्यवसाय, कृषी पणन, फुलशेती, खादी ग्रामोद्योग, कापूस संशोधन केंद्र, महाबीज आदि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे कृषीशी निगडीत २०० विभागांचेही स्टॉल्स येथे उभारण्यात आले आहेत.
 या जिल्हा कृषी महोत्सवाचे आमदार नागो गाणार व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी फित कापून उदघाटन केले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे डॉ. विजय वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे आणि आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर उपस्थित होत्या.
 कृषी महोत्सवाचे उदघाटक म्हणून बोलताना आमदार नागो गाणार यांनी स्वातंत्र्यानंतर कृषीप्रधान देशात कृषी विभागाकडे कायमच दुर्लक्ष झाल्याचे सांगितले. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये यात बदल झाला असून, आता अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे पाहण्याची मानसिकता बदलली पाहीजे. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या अनेक योजना कृषी विभागाकडून शेतकऱ्यांपर्यंत योग्य वेळी पोहचविल्या गेल्या पाहिजेत. या योजनांबाबत शेतकऱ्यांपर्यंत विविध योजनांची जनजागृती झाली पाहिजे, असे आमदार नागो गाणार यांनी सांगितले.
 कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सन्मानजनक वागणूक दिली पाहिजे. त्यांना विविध योजनांबाबत मार्गदर्शन करताना मानवीय भावना लक्षात घेतल्या पाहिजेत. असे झाल्यास शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व कृषी योजना नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास आमदार नागो गाणार यांनी  व्यक्त केला.
 ‘आत्मा’ आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून, या महोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या सेंद्रीय शेती उत्पादनांचे भरपूर स्टॉल्स येथे लावण्यात आले आहेत. हा महोत्सव पाच दिवस चालणार असून, शेतकऱ्यांचे सेंद्रीय शेती उत्पादन हे थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी त्यांच्या मालाची विक्री व प्रदर्शन भरवण्याचे काम आत्मा आणि कृषी विभागाने केले आहे. या महोत्सवात सर्व दिवस विविध कृषीतज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.
 महोत्सवात २०० स्टॉल उभारण्यात आले असून, राज्य शासनाच्या कृषी विभागाशी संबंधित तब्बल ३० स्टॉल्स आहेत. या स्टॉल्स आणि महोत्सवात नवनवीन कृषी तंत्रज्ञान, या तंत्रज्ञानाची व विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे.  त्यानुषंगाने सेंद्रीय शेतीला चालना मिळेल. सेंद्रीय शेतीचा शेतकरी आणि ग्राहकांच्या आरोग्यास जास्त फायदा आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. मुदगल यांनी ग्राहकांनी शेतकऱ्यांकडूनच कृषी उत्पादनांची खरेदी करावी.  ग्राहक व शेतकरीवर्ग दोघांनाही त्याचा फायदा होईल,असे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.
 या महोत्सवात कृषी प्रदर्शन, परिसंवाद, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महामंडळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, भारत संचार निगम, जिल्हा परिषद, संशोधन संस्था आदि स्टॉल आहेत.  या महोत्सवात ४६ शेतकऱ्यांच्या सेंद्रीय गटांकडून सेंद्रीय माल प्रदर्शन व विक्रीकरीता ठेवण्यात आला आहे.
 कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेली शेतकरी, प्रगतीशील शेतकरी, जिल्हा व तालुकास्तरीय पीक स्पर्धा विजेते शेतकरी, गटसंस्था यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ब्लॅक राईसचे आणि कापूस फरदड घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी आमदार नागो गाणार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, केंद्रीय कापूस संशोधन केंद्राचे डॉ. विजय वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे आणि आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी शेतकऱ्यांच्या विविध स्टॉलला भेटी दिल्या.



  Print






News - Nagpur | Posted : 2019-01-12






Related Photos