काटली येथे ‘व्यसन – दशा आणि दिशा’ विषयावर संवाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
राष्ट्रीय महिला महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर तालुक्यातील काटली या गावी घेण्यात आले.  शिबिरादरम्यान ‘व्यसन – दशा आणि दिशा’ विषयावर युवकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन मुक्तिपथ द्वारे करण्यात आले होते. युवा वर्गात वाढत असलेल्या व्यसनाधीनतेवर चर्चात्मक पद्धतीने प्रकाश टाकण्यासाठी सदर कार्यक्रम घेण्यात आला.
  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शरयू गहेरवार तर प्रमुख अतिथी म्हणून रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, प्रा. डॉ. प्रज्ञा त्रिपाठी, डॉ. शुभाआस्था शर्मा, सुयश तोष्णीवाल मंचावर उपस्थित होते. 
उपस्थितांना उद्देशून डॉ. आरेकर म्हणाले, गडचिरोली शहरातीलच नाही तर देशातील युवक व्यसनाच्या आहारी जात आहे. व्यसनाचे जीवघेणे प्रकार दिवसेंदिवस समोर येत आहे. तरुणांचे आरोग्यच यामुळे धोक्यात आले आहे. युवा वर्गाला व्यसनाधीनतेतून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण समाजानेच आणि खास करून महिलांनी पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या विषयवस्तूवर प्रकाश टाकताना सुयश तोष्णीवाल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील व्यसनाची वस्तुस्थिती सांगितली. येथील व्यसनाची समस्या दूर करणे हे युवकांच्याच हाती असून ही आपली जबाबदारी असल्याचे भान युवकांनी राखणे आवश्यक आहे. विविध मार्गांनी व्यसनाची समस्या सोडवून जिल्ह्याचा विकास करायचा की केवळ बघ्याची भूमिका घेऊन एक दिवस स्वतःच व्यसनाच्या आहारी जायचे हे तुम्हीच ठरवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. युवतींनी आणि महिलांनी या समस्येसाठी पुढे येण्याची गरज डॉ. शुभाआस्था शर्मा यांनी व्यक्त केली.
  खर्रा सेवन केल्याने होत असलेले शारीरिक दुष्परिणाम सांगणारा ‘यमराजाचा फास’ हा लघु चित्रपट दाखवून मुक्तिपथ तालुका संघटन मनोज पिसुड्डे आणि प्रेरक मंजुषा पोर्लीकर यांनी चर्चा घडवून आणली. सोबतच नजीकच्या मोहझरी गावातील दारूविक्री बंद करण्यासाठी काटली येथील महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही केले. ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-12


Related Photos