गतिमंद अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने केला बलात्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : 
गतिमंद अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चाकणमधील ग्रामीण भागात घडली.  याप्रकरणी चाकण पोलिसांनी ४६ वर्षीय नातेवाईकाला अटक केली असून खेड न्यायालयाने त्या नराधमाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 चाकणमधील ग्रामीण भागात १४ वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलगी तिच्या वडिलांसह राहते. तिचे वडील शेतकरी असून तिच्या आईचे काही वर्षांपूर्वी आजारामुळे निधन झाले होते. मुलीची जबाबदारी वडिलांवर होती. मुलीकडे लक्ष देण्यासाठी वडिलांनी दुसरे लग्न केले नव्हते. गावात राहणारे नातेवाईक नियमितपणे त्यांच्या घरी यायचे आणि त्यांची विचारपूस करायचे.
दोन दिवसांपूर्वी मुलीचे वडील शेतात कामासाठी गेले होते. तर पीडित मुलगी घरी एकटीच होती. यादरम्यान पीडित मुलीच्या आत्याचे पती घरात पोहोचले. त्यांनी दरवाजा बंद करुन पीडित मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणाची वाच्यता केल्यास ठार मारु अशी धमकीही दिली. पीडित मुलीने आत्या शेतात काम करत असताना तिच्याकडे पोटदुखीची तक्रार केली. आत्याने तिची विचारपूस केली असता तिने हा धक्कादायक प्रकार सांगितला. आत्याने क्षणाचाही विलंब न करता विकृत पतीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले.
 पोलिसांनी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. आरोपीला खेडच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.  
   Print


News - Rajy | Posted : 2019-01-12


Related Photos