महत्वाच्या बातम्या

 खरीपात शेतकऱ्यांना सहजतेने निविष्ठा उपलब्ध होतील याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


-  खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
-  4.33 लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन
-  64 हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा अतिशय महत्वाचा असतो. या हंमागात शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खतांसह आवश्यक कृषि निविष्ठा सहजतेने उपलब्ध होईल याची दक्षता घ्या, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.विद्या मानकर, कार्यकारी अभियंता रवी वऱ्हाडे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक वैभव लहाणे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी खरीप हंगामाचा बाबनिहाय आढावा घेतला. या खरीप हंगामात 4 लाख 33 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून सर्वाधिक 2 लाख 15 हजार हेक्टरवर कापूस तर 1 लाख 35 हजार हेक्टरवर सोयाबिनच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रस्तावित नियोजनाप्रमाणे बि-बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यानुसार विविध पिकांचे 64 हजार क्विंटल बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी संबंधित कंपन्यांशी समन्वय साधन्याचे निर्देश बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
खरीपाच्या नियोजनानुसार रासायनिक खतांची देखील मोठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे. 1 लाख 14 हजार मेट्रीक टन इतकी विविध प्रकारच्या खतांची मागणी आहे. त्यात युरीया, डीएपी, एमओपी, एसएसपी. व अन्य खतांचा समावेश आहे. जिल्ह्याला आवश्यकतेप्रमाणे टप्प्याटप्प्याने खते उपलब्ध होतील व कृषि सेवा केंद्रांमार्फत निर्धारीत दराने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील याची काळजी घ्या. वितरणात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार व ज्यादा भाव आकारले जाणार नाही, याकडे लक्ष देण्याची सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.


खरीप हंगामात शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या तक्रारींचे वेळीच निराकरण होणे आवश्यक आहे. यासाठी तयार केल्या जात असलेल्या भरारी पथकाने काटेकोरपणे कारवाई करावी. कुठे गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास त्यावर प्रतिबंध घालावा. खते, बियाणे विक्री केंद्रांना भेटी देण्यासोबतच कृषि निविष्ठा वाहतुकीत अडथळा येणार नाही याकडे लक्ष द्यावे.


गुणनियंत्रणासाठी 9 भरारी पथके
शेतकऱ्यांना प्रमाणित आणि उत्तम दर्जाचे बियाने, खते व अन्य कृषि निविष्ठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषि निविष्ठांच्या गुणनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे 8 अशा एकुण 9 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय पथकाचे प्रमुख कृषि विकास अधिकारी तर तालुकास्तरीय पथकाचे प्रमुख तालुका कृषि अधिकारी आहेत. पथकात कृषिसह वजनमापे निरिक्षकांचा देखील समावेश आहे.


1 हजार 200 कोटींच्या कर्जवाटपाचे नियोजन
जिल्ह्यात सन 2023-24 या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना 1 हजार 200 कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात 900 कोटी रुपये खरीप हंगाम तर 300 कोटी रुपये रब्बी हंगामासाठी वाटपाचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांना विना अडथळा पीककर्ज उपलब्ध झाले पाहिजे. कुठेही कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही, याकडे लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बैठकीत दिले. 





  Print






News - Wardha




Related Photos