लोकसहभागातून गावांचा सर्वांगिण विकास : अमृता फडणवीस


- फेटरी हे गाव आदर्श ठरले
- ग्रामस्थांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा
- ग्रामपंचायत भवनचे उद्घाटन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  नागपूर
: गावाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या सोबत लोकसहभाग महत्वाचा आहे.  फेटरी या गावांचा ‘आदर्श गाव’ म्हणून विकास करतांना जनतेला सर्व योजनांचा लाभ देतांनाच उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्यामुळे आदर्श गावासोबत  प्रेक्षणीय गाव ठरले आहे, असे प्रतिपादन  अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
  यावेळी आमदार समीर मेघे, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्य अधिकारी  आशा पठाण, फेटरीच्या सरपंच  धनश्री ढोमणे, कवडसच्या सरपंच  मनिषा गावंडे, जिल्हा परिषद सदस्या  वंदना पाल, राजू वाघ तसेच कवडस वासी उपस्थित होते.
  कोणत्याही गावात विकासकामे सुरु असतांना गावकऱ्यांची सकारात्मक दृष्टी आणि इच्छाशक्ती महत्वाची भूमिका बजावतात.  फेटरीवासीयांच्या ग्राम विकासातील महत्वपूर्ण योगदानामुळे आज फेटरी गाव हे आदर्श ठरल्याचे   अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटरी गाव दत्तक घेतले आहे. येथील विविध विकास  प्रकल्पांचे  लोकार्पण तसेच ग्रामपंचायत भवनाचे उद्घाटन  अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
   ग्रामस्थांशी संवाद साधतांना  फडणवीस म्हणाल्या, फेटरीत आज खूप परिवर्तन झाले आहे. येथे आदर्श सार्वजनिक वाचनालय, आदर्श अंगणवाडी, स्मशानभूमिचा विकास, सार्वजनिक वाचनालय, ग्रामस्थांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामस्थांना या सर्व सुविधांचा लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 ग्रामस्थांच्या ग्राम विकासाच्या इच्छेमुळे आणि पुढाकारामुळे फेटरीचा आदर्श गाव म्हणून नाव लौकिक झाला असून गावाला आज  आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे,असेही अमृता फडणवीस यांनी यावेळी  सांगितले.

महिलांची भूमिका महत्वपूर्ण

  स्त्रियांनी बचत गटासारखे लहान-लहान गटांची श्रृंखला  बनवावी.  जेणेकरुन महिलांनी उत्पादित वस्तूंना योग्य भाव आणि जवळच बाजारपेठ देखील उत्पन्न होईल.  यासाठी महिलांनी  एकत्रित येवून व्यवसाय सुरु करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
  येथील केंद्रीय उच्च माध्यमिक शाळेत नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन श्रीमती फडणवीस यांनी केले. यावेळी शिक्षक प्रशिक्षक संदीप शर्मा यांनी विविध विज्ञान प्रयोगांची माहिती उपस्थितांना दिली. फेटरीसह कवडस तसेच वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग शाळेची निर्मिती करण्यात आली आहे.
   कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत काटोल रोड वरील बीएमपीटी स्कील डेव्हल्पमेंट सेंटर येथे ‘उर्जा मित्र प्रशिक्षण केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना मुंबई येथे तीन महिन्यांचे  कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून प्रशिक्षणासाठी त्यांची नाव नोंदणी सुरु आहे.  फडणवीस यांनी या केंद्राला भेट दिली. यानंतर गावाच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या ट्रीटमेंट प्लांटचे उद्घाटन केले. यावेळी फेटरी या दत्तक गावातील ग्राम पंचायत कार्यालयाचे तसेच येथील आदर्श सार्वजनिक वाचनालयाचे  उद्घाटन केले. फेटरी गाव आज खूप विकसित झाले असून विकासाची गंगा प्रत्येक गावागावात पोहचविण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  Print


News - Nagpur | Posted : 2019-01-11


Related Photos