सुगंधित तंबाखूसह ३ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त, एसीडीपीओ गडचिरोली च्या पथकाची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे व त्यांच्या पथकाने अवैधरित्या सुगंधित तंबाखूचा साठा करणाऱ्यांवर कारवाई केली असून १ लाख ७६ हजार रूपयांच्या सुगंधित तंबाखूसह १ लाख ३० हजार रूपये किमतीचे वाहन जप्त केले आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पोलिस हवालदार विजय राउत, पोलिस हवालदार प्रेमकुमार दुर्गे, नापोशि थामदेव कोहपरे यांनी आरमोरी येथे शासकीय पंचांना पाचारण करून अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्र.श. कुचेकर यांना पाचारण केले. आरमोरीचे पोलिस निरीक्षक अजीत राठोड व पोलिस पथकासह बाजारटोली आरमोरी येथील आनंद श्रीकोंडावार , पालोरा मार्ग आरमोरी येथील आरीफ कासमनी तसेच आझाद चौक येथील अरफाज लाकडीया यांच्या घरांची झडती घेतली. यावेळी बिनापरवाना सुगंधित तंबाखू आढळून आला. तसेच सुगंधित तंबाखू चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा करण्याकरीता ठेवलेले एमएच ३३ सी १२९७ क्रमांकाची टाटा जिप वाहन आढळून आले. असा एकूण  ३ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरमोरी पोलिस ठाण्यात कलम १८८ , २७३ भादंवी, ३, ५९ अन्नसुरक्षा आणि मानदे अधिनियम २००६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-11


Related Photos