महत्वाच्या बातम्या

 पालकांच्या खिशाला महागाईचा चटका : पाठ्यपुस्तकांच्या किमती १० ते २० टक्के वाढणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये वह्यांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ पासून उपलब्ध करुन दिली जाणार आहेत.

मात्र, कागदाच्या वाढलेल्या दराचा फटका पाठ्यपुस्तकांना बसणार आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या किंमती १० ते २० टक्क्यांनी वाढणार आहेत. त्याबाबत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे मूल्यांकनाचे काम सुरू आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा शासन निर्णय मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला होता. त्यानुसार जूनच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ३ ते इयत्ता ८ च्या पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने जोडली जाणार आहेत. याशिवाय इयत्ता २ ते ८ ची पाठ्यपुस्तके ४ भागांमध्ये विभागली जाणार असून, वह्यांची पाने याला जोडल्याने पुस्तकांच्या किंमती वाढणार आहेत.

यंदा पाठ्यपुस्तकांमध्ये कोरी पाने समाविष्ट केली जाणार आहेत. मात्र कागदापासून सर्वच किंमती वाढल्या आहेत. शासनाला कागद विकत घ्यावा लागतो. त्यासाठी किती कागद लागेल, पुस्तकांचा साईज काय असेल याबाबत मूल्यांकन केले जात आहे. त्यामुळे पुस्तकांच्या किंमती वाढतील. त्याबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही. - कृष्णकुमार पाटील, संचालक, म.रा. पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ





  Print






News - Rajy




Related Photos