चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने २६ जानेवारीपासून लोकशाही पंधरवाडा


- महापौर, आयुक्तांची पत्रकार परिषदेतून माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
२६ जानेवारी २०१८ पासून लोकशाही पंधरवाडा साजरा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर यावर्षीसुध्दा २६ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने राज्य निवडणुक आयुक्तांच्या सुचनेनुसार लोकशाही पंधरवाडा आयोजित करण्यात येत असल्याची माहिती महापौर अंजली घोटेकर, आयुक्त संजय काकडे यांनी स्थायी समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.
लोकशाही पंधरवाड्याचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये मतदानाप्रती जनजागृती निर्माण करणे, मतदानाची टक्केवारी वाढविणे ज्या मतदान केंद्रात महिला मतदारांची टक्केवारी कमी आहे त्या मतदान केंद्रावर महिला मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, मतदानाचे महत्व पटवून देणे, युवा पिढीमध्ये जागरूकता निर्माण करणे, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम राबविणे, लोकशाही जनजागृती व सुशासन या विषयावर चर्चासत्र आयोजित करणे असा आहे. 
२६ जानेवारी रोजी महापौर घोटेकर यांच्याहस्ते गांधीभवन महापालिकेच्या इमारतीवरील ध्वजारोहण कार्यक्रम होईल. यावेळी लोकशाही, निवडणूका, सुशासन या बाबत महापौर भाषण करतील. २७ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यंत निवडणूक आयोगाने निर्देशीत केल्याप्रमाणे दैंनिक व साप्ताहीक वृत्तपत्रांमध्ये व्यापक प्रसिध्दी करण्यात येणार आहे. १ ते ३  फेब्रुवारी पर्यंत चंद्रपूर शहरातील महाविद्यालयातील प्राचार्यांची सभा आयोजित करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याच्या सुचना देण्यात येणार आहेत. ४ ते ६ फेब्रुवारीपर्यंत महिला मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या केंद्रांचा शोध घेवून मोहिम राबविण्यात येणार आहे. ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निवडणूक सुधारणा उपाययोजना या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-10


Related Photos