चारा साक्षरता अभियान अंतर्गत कार्यशाळा संपन्न


-मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दाखविली चारा रथास हिरवी झेंडी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :   
महाराष्ट्र राज्य सध्या नजीकच्या काळातील सर्वात जास्त चारा टंचाईस सामोरे जात आहे. या पर्श्वभूमीवर पशुपालकामध्ये उपलब्ध चाऱ्याच्या सुयोग्य नियोजनाबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने तुमसर येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती तुमसरच्या सभापती रोशनाताई नारनवरे होत्या. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नितीन फुके यांनी पशुसंवर्धन विष्यक व्यवसायातून ग्रामीण भागातील जनतेची कशी आर्थिक उन्नती होवू शकते याबाबत  मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, पंचायत समिती तुमसरचे सदस्य हिरालाल नागपूरे  यावेळी उपस्थित होते. यावेळी रविंद्र जगताप यांनी महिला तसेच पशुपालकांना चाऱ्याचे महत्व सांगून मौदा तालुक्यातील अरोली येथील शेतकऱ्यांनी चारा कंपनी व त्यांची उलाढाल याबाबत माहिती देवून त्याचप्रमाणे आपण सुध्दा एकत्रितपणे चारा उत्पादन करण्याचे  आवाहन केले. पारंपारिक पध्दतीने केवळ धानाचे पिक घेण्यापेक्षा ज्वारी, मका, बाजरी यांचे उत्पादन घेतल्यास त्यापासून धानासोबत जनावरांना आवश्यक पौष्टिक चारा मिळून त्यांचे आरोगय सुदृढ होऊन उत्पादन वाढेल, असे त्यांनी सांगितले. भंडारा जिल्हयामध्ये पशुसंवर्धन विभागाचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून नुकतेच भंडारा येथे आयोजित कृषि महोत्सवात पशुसंवर्धन विभागामार्फत उच्च दर्जाचे जनावरे तसेच वैरण पिकांबाबत माहिती देणारे दालन लावून माहिती दिली होती. अशा प्रदर्शनीला माहिलांनी अवश्य भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.  यावेळी जिल्हयातील पशुपालकांना चाऱ्याचे महत्व पटवून देण्यासाठी पशुसंर्वधन विभागातर्फे तयार केलेल्या चारा साक्षरता अभियानाच्या चारा रथास मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी  हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. तुमसरचे पशुधन विकास अधिकारी डॉ. जे.जे. देशट्टीवार यांनी गाळपेर क्षेत्रावर चारा पिके घेणे या वैरण विकास योजनेबाबत माहिती दिली तर पशुधन विकास अधिकारी डॉ. पंकज कापगते यांनी सादरीकरण करुन संपूर्ण माहिती दिली.
 या कार्यशाळेस ११९ पशुपालक शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विष्णू दळवी यांनी केले. सदर कार्यक्रमास तुमसरचे गटविकास अधिकारी ए.पी. मोहोड, सहाय्यक गटविकास अधिकारी एन.पी. बडगे तसेच उमेद अंतर्गत महिला गटाचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
 यावेळी  वैरण उत्पादनाच्या संक्षिप्त पेरणी पध्दती या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. चारा रथ जिल्हयातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यातील गावात जावून पशुवैधक या मार्फत चाऱ्याचे महत्व व त्याची माहिती शेतकऱ्यांना देणार आहे.  Print


News - Bhandara | Posted : 2019-01-10


Related Photos