सर्चमध्ये विविध आजाराच्या १०७ शस्त्रक्रिया : १८ डॉक्टरांची चमू सहभागी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
सर्च येथील मा दंतेश्वरी धर्मादाय दवाखान्यात ६ ते ७ जानेवारी दरम्यान आयोजित शिबिरात विविध आजाराच्या तब्बल १०७ शस्त्रक्रिया झाल्या. सातारा आणि बारामती येथील १८ डॉक्टरांच्या चमूने या शस्त्रक्रिया केल्या. गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील तसेच छत्तीसगड आणि आंध्रप्रदेश येथील रुग्णांवर शिबिरात उपचार झाले.
मा दंतेश्वरी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रियेची गरज लक्षात घेत नियमित शिबिरे घेतली जातात. गर्भाशय विकार, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल यासह इतरही आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ६ ते ७ जानेवारी दरम्यान शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. शिबिरात गर्भाशयाशी संबंधित आजाराच्या ४० तर अंडवृद्धी आजाराच्या ५० शस्त्रक्रिया झाल्या. त्याचबरोबर मुतखडा, लहान मुलांचा हर्निया, अपेंडिक्स, भगंदर असे आजार असलेल्या रुग्णांचाही यात समावेश होता. कुटुंबनियोजनाची आवश्यकता लक्षात आल्याने जिल्ह्यात हळूहळू नसबंदी शस्त्रक्रिया करवून घेण्याचे प्रमाण वाढत आहे. पण अनेकदा केलेली नसबंदी उघडण्याचीही वेळ येते. ही गरज लक्षात घेत नसबंदी उघडण्याच्या २ शस्त्रक्रिया यावेळी झाल्या. शिबिरात जळलेल्या हातावर प्लास्टिक सर्जरीही करण्यात आल्या. 
रुग्णालयाच्या संचालक डॉ. राणी बंग आणि डॉ. मिलिंद शाह यांच्या मार्गदर्शनात डॉ. गिरीश पेंढारकर, डॉ. शशिकांत पवार, डॉ. प्रमोद राजभोई, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. महेश प्रभू, डॉ. चिटणीस, डॉ. तलाठी, डॉ. अमन यांनी या शस्त्रक्रिया केल्या. भूलतज्ञ म्हणून डॉ. वर्षाली केनिया, डॉ. सुजित अडसूळ, डॉ.
जयवंत पाटील आणि डॉ. वैभव माने यांनी भूमिका सांभाळली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. स्वाती श्रोती, युसुफ गिलानी, राजू गिलानी यांच्यासह चंद्रपूर आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. सर्च च्या वैद्यकीय चमूतील डॉ. चैतन्य मलिक, डॉ. वैभव तातावार, डॉ. शिल्पा मलिक, डॉ. दत्ता भलावी, डॉ. मयुरी भलावी, डॉ. अमित गिराम, डॉ. मौनी नागडा यांनी शिबिराची व्यवस्था सांभाळली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना शारीरिक हालचाली नीट करता याव्या यासाठी पुण्याच्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाच्या फ़िजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी सेवा देत आहेत.
 

शोधग्रामला ‘ट्रायबल व्हिलेज’ चे स्वरूप

ग्रामीण आदिवासी भागातून शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांसोबत त्यांचे बरेच नातेवाईक सर्च मध्ये येतात. जानेवारी महिन्यातील गारठा लक्षात घेत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची व राहण्याची सोयही करण्यात आली आहे. त्यामुळे शोधग्रामला ट्रायबल व्हिलेजचे स्वरूप आले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-10


Related Photos