संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान १ तारखेला लाभार्थ्यांच्या हातात मिळेल अशी व्यवस्था निर्माण करा : सुधीर मुनगंटीवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई  : 
संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे मासिक अनुदान त्या महिन्याच्या १ तारखेला हातात मिळेल अशी व्यवस्था निर्माण करा, त्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचे  सहकार्य घ्या, असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.  यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह इतर संबधित अधिकारी उपस्थित होते. 
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना यासह केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना यासारख्या योजनांची राज्यातील लाभार्थी संख्या २९ लाख इतकी मोठी आहे. त्यांना  योजनांचे अनुदान खूप उशिरा मिळते ही तक्रार वारंवार ऐकायला मिळते. योजनेतील लाभार्थी हे गरीब घटकातील आहेत त्यांना या योजनामधून मिळणारे अनुदान हे वेळेतच मिळाले पाहिजे, असे सांगून श्री मुनगंटीवार म्हणाले, सामाजिक न्याय विभागाने या कामी पुढाकार घ्यावा, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने एक सॉफ्टवेअर विकसित करावे.                                            
योजना ज्या यंत्रणेमार्फत राबविल्या जातात त्या तहसील कार्यलयातील रिक्त पदे किती याचा आढावा घेतला जावा,  प्रत्येक योजनेचे  जिल्हानिहाय लाभार्थी किती याची माहिती घेऊन ती संगणकावर  उपलब्ध करून  दिली जावी, अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी  दिल्या. ते पुढे म्हणाले, योजनांचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जावा, लाभार्थी किती वाढले किती कमी झाले याची माहिती घेतली जावी. संजय गांधी निराधार अनुदान योजनेत लाभार्थींची वयोमर्यादा १८ ते ६५ अशी आहे, योजनेतील निराधाराना अनुदान द्या पण त्यातील वर्क फोर्स निवडून त्यांना कौशल्य प्रशिक्षण द्या, रोजगार उपलब्ध करून घ्या, त्यांना सक्षम करा, स्वावलंबी करा, त्यादृष्टीने काही योजना आणता येईल का, याचा विचार करून  विभागाने तशी योजना आणावी, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या.
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांची इतर राज्यात कशा प्रकारे अंमलबजावणी केली जाते याचा ही विभागाने अभ्यास करावा, असेही ते म्हणाले.  Print


News - Rajy | Posted : 2019-01-10


Related Photos