जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला पोलिओ लस द्या : अश्विन मुदगल


-तीन लाख २० हजार पोलिओ लसीची मागणी पूर्ण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
येत्या ३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला पोलिओ लस द्या. जिल्ह्यातील  शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा हिवताप अधिकारी मोनिका चारमुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद गणवीर यावेळी उपस्थित होते.   
पोलिओच्या प्रादुर्भावामुळे बालकांना कायमचे अपंगत्व येते. त्यामुळे ते टाळण्यासाठी देशपातळीवर याची मोठ्या प्रमाणावर जनजागृतीही करण्यात येते. पोलिओच्या समूळ उच्चटनासाठी देशपातळीवर १९९५ पासून संपूर्ण देशात पल्स पोलिओ लसीकरण ही मोहीम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात २०१० मध्ये पाच पोलिओग्रस्त बालके आढळून आली होती. त्यानंतर गेल्या आठ वर्षांत एकही बालक आढळून आलेले नाही. मात्र असे असतानाही जिल्ह्यात १५९४ गावे आणि १० शहरांमध्ये ही मोहिम राबविण्यात येणार असून, त्यासाठी ५ वर्षाखालील २ लाख १३ हजार ५७५ बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी 2528 लसीकरण केंद्र राहणार असून, ट्रान्झीट आणि मोबाईल टीम दोन्ही मिळून एकूण ५७० दिवस काम करणार आहेत. त्यासाठी या सर्व टीम महामार्ग, रस्त्यांच्या बाजूला असलेल्या वस्त्या, घरे, धाबे, शेतातील मजूरांची बालके, भटक्या लोकांची मुले, इमारत बांधकामावरील मजुरांची बालके, शिवाय बाजाराच्या दिवशी येणाऱ्या बालकांनाही ही लस देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले. गावात ग्रामसभ, दवंडी,सर्व बसस्थानके, रेल्वेस्थानके, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच गावात प्रभातफेरी काढूनही जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच तालुक्यासाठी एक जिल्हास्तरीय पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून, जिल्ह्यात तीन लाख २० हजार पोलिओ डोसची मागणी करण्यात आली होती. ती पूर्ण झाली असलयाचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी सांगितले.
 

हत्तीरोग निर्मूलन मोहीम यशस्वीपणे राबवा :  जिल्हाधिकारी
-२० जानेवारीपासून मोहिमेला प्रारंभ
 
शहरात हत्तीरोगाच्या‍ समूळ उच्चाटनासाठी हत्तीरोग निर्मूलन मोहीम यशस्वीरित्या राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी संबंधित विभागाला दिले.
छत्रपती सभागृह येथे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.  यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, जिल्हा हिवताप अधिकारी मोनिका चारमुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद गणवीर यावेळी उपस्थित होते.
 नागपूर शहरात आयवरमेक्टीन, डी. ई.सी. आणि अल्बेंडॉझॉल (आयडीए) ट्रीपल ड्रग्ज थेरेपीद्वारे राबविण्यात येणार असून, कृती आराखडा महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने तयार केला आहे. शहरातील २८  लाख ९९ हजार ८९० लोकसंख्येला ९ ते १५ दिवसांत गोळ्या वितरणासाठी 4 हजार कर्मचारी  आवश्यक आहेत. हत्तीरोग दुरीकरणांतर्गंत जनतेतील हत्तीरोगाचा प्रसार करणाऱ्या जंतूंचा जंतूभार कमी करण्यासाठी ट्रिपल ड्रग थेरेपी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे याची बाह्य लक्षणेयुक्तांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.



  Print






News - Nagpur | Posted : 2019-01-10






Related Photos