शैलेश नवाल यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारासाठी निवड


-नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख संकल्पना राबविण्यासाठी राज्यशासनाकडून पुरस्कार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : 
 राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि नवनवीन संकल्पना राबविणाऱ्या जिल्हाधिका-याचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात येतो. २०१७-१८ या वर्षांसाठी राज्यातील सात जिल्हाधिकाऱ्यांची यासाठी निवड झाली आहे. यामध्ये वर्धेचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी  शैलेश नवाल यांनी विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून लोकाभिमुख व पारदर्शक काम करून प्रशासनात  वेगळी ओळख निर्माण केली. महिला बचत गट आणि शेतकऱ्यांना विविध लघु उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहित करून त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी देऊन रोजगार निर्मितीसाठी काम केले.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी वर्धा जिल्ह्यात रुजू होताच  जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाईन सेवा देण्यावर भर दिला. त्यासाठी विविध ई –सेवा सुरू केल्यात. जिल्हाधिकारी कार्यालय पेपरलेस करण्यासोबतच नागरिकांना सर्व योजनांची माहिती एका ठिकाणी घरबसल्या उपलब्ध व्हावी म्हणुन ‘आपल्या योजना’ हे मोबाईल अँप तयार केले. त्याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करण्यात पारदर्शकता यावी यासाठी नियोजन अँप तयार केले असून त्यावर प्रत्येक विभागाला झालेल्या कामाचे फोटो आणि व्हिडिओ  अपलोड करावे लागतात.  झालेल्या सर्व कामाची  माहिती जनतेला संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे कामात पारदर्शकता आली आहे.
लोकसहभागातून पांदण रस्ता ही त्यांनी वर्धा जिल्ह्यात राबविलेली योजना राज्य सरकारने स्वीकारली असून जिल्ह्यात या योजनेंतर्गत २५० किलोमीटरचे पांदण रस्ते तयार करण्यात आले आहेत. तर शेतीसाठी रस्ता उपलब्ध झाल्यामुळे ४३२ हेक्टर शेती लागवडीखाली आली आहे.सौर उर्जेवर जल उपसा उपसिंचन प्रकल्प राबविण्यात आला. यामुळे पिंपळगाव (भोसले) आणि नटाळा (बोथली) या गावातील शेतकऱ्यांना बारमाही सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे. सौरऊर्जेवर सुरू झालेली ही महाराष्ट्रातील ही एकमेव सामूहिक सिंचन पद्धती आहे. त्याचबरोबर गुन्हे माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित करून बंधपत्राचे उल्लंघन करणा- या आरोपीना यामुळे शिक्षा व दंड झाला आहे.
रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महिला व शेतकरी बचत गटांना विविध व्यवसायासाठी मार्गदर्शन आणि निधी उपलब्ध करून दिला.  कॉटन टू क्लाथ च्या माध्यमातून चार गावात कापड निर्मिती सुरू केली. मायक्रो एटीएम : आपले आधार आपली बँक या प्रकल्पमार्फत ११५ गावात बँक पोहचवली आणि गावातील एका महिलेला रोजगार उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर कवठा झोपडी येथे अनुसूचित जातीच्या २५० महिलांना सोलर पॅनल निर्मिती कारखाना सुरू करून रोजगार उपलब्ध करून दिला.  केवळ महिलांनी सुरू केलेला हा सोलर उपकरणांची निर्मिती करणारा हा देशातील  दुसरा आणि महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प आहे.. तसेच महिला बचत गटांची आणि शेतकऱ्यांची उत्पादने विकण्यासाठी रूरल मॉल  वर्धा शहरात उपलब्ध सुरू केला.
 संवाद : टोल फ्री हेल्पलाईन सुरू करून नागरिकांच्या तक्रारीचे  निराकरण करण्यात येत आहे. चिडीमारी रोखण्यासाठी आणि मुलींची या मानसिक त्रासातून सुटका व याबाबत जनजागृती करण्यासाठी अपील उपक्रमाच्या माध्यमातून १०९८ आणि १०९१ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिलेत. मुलींनी यासाठी पुढे यावे म्हणून स्वतः काही शाळांमध्ये मुलींशी संवाद साधला. महात्मा  गांधींचे विचार शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी  उड्डाण उपक्रम राबवून ग्रामीण भागातील गरीब आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीला जाण्याची संधी उपलब्ध करिन दिली. अशा अनेक नाविन्यपूर्ण  उपक्रमांची दखल घेऊन राज्यशासनाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड केली आहे.  Print


News - Wardha | Posted : 2019-01-09


Related Photos