समाज परिवर्तनात सामाजिक संस्थांचे मोठे योगदान : मिलिंद बोकील


- निर्माणच्या ९ व्या  सत्राचे पहिले शिबीर 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
माणूस आणि त्याच्यामुळे अस्तित्वात येणारा लोकांचा समूह हा समाज या नावाने जगाच्या केंद्रस्थानी असतो. या समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे काम राष्ट्रराज्य किंवा सरकार करीत असते. त्याचबरोबर समाजाचे नियमन करण्यासाठी धर्म ही संस्था प्रभाव पाडत असते. तर वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये आदानप्रदान होण्यासाठी बाजार (मार्केट) ही संस्था परिणाम करीत असते. शक्य तितक्या सूक्ष्म पातळीवर मदत पोहोचवावी, इतर तीन संस्थांच्या नकारात्मक परिणामांवर अंकुश ठेवून मूल्यांच्या पातळीवर समाजाला नवी दिशा दाखवण्याचे काम सामाजिक संस्था करीत असतात. त्यामुळे समाज परिवर्तनात सामाजिक संस्थांचे योगदान हे मोलाचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बोकील यांनी केले.
‘निर्माण’च्या नवव्या सत्राचे पहिले शिबीर नुकतेच शोधग्राममध्ये घेण्यात आले. यात महाराष्ट्रासह इतरही राज्यातील एकूण ५३ युवा सहभागी झाले होते. यावेळी मिलिंद बोकील ‘सामाजिक संस्थांची भूमिका’ या सत्रात बोलत होते. आजच्या समाजात सामाजिक संस्थांची गरज व्यक्त करताना ते म्हणाले, शासन ही एक स्थायी संस्था असून काही नवीन निर्माण करून ते समाजाला देऊ शकत नाही. शासनसंस्था केवळ कायदे आणि नियम बनवून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम करते. राष्ट्रराज्य मोठ्या पातळीवर काम करीत असताना सूक्ष्म पातळीवर काम करू शकत नाही. शासन खूप कामे अंगावर घेते. पण यातील बरीच कामे अर्धवट राहतात. तसेच धर्म हा अपरिवर्तनशील असून तो स्वतःला समाजासोबत बदलू शकत नाही. मार्केट ही परिवर्तनशील संस्था असली तरी त्यात नफा केंद्रस्थानी असतो. त्यामुळे जिथे नफा नाही तिथे मार्केट फिरकतही नाही. या सर्व कमतरता आणि मर्यादा लक्षात घेऊन त्या पूर्णत्वास नेण्याचे काम सामाजिक संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी करीत असतात. या बाबी उदाहरणांतून समजावून सांगताना मिलिंद बोकील म्हणाले, राष्ट्रराज्य देशाच्या विकासासाठी अनेक प्रकल्प उभे करते. पण यातून होत असलेल्या विस्थापितांना न्याय मिळवून देण्याचे कार्य सामाजिक संस्था करतात. अनेक कंपन्या भारतात माल उत्पादित करतात. पण यातून होत असलेले प्रदूषण थांबविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व संस्था झटत असतात. धर्म हा माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग असला तरी अनेक विसंगत धार्मिक चालीरीती समाजात प्रचलित असतात. अशा चालीरीतींविरोधात आवाज उठवून त्यात बदल करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था धडपडत असतात. त्यामुळे आजच्या समाजातील विविध प्रश्नांवर उत्तर शोधण्याचे काम सामाजिक संस्था करीत आहेत. असे असतानाही या संस्थांकडे आजही हिणकस भावनेने बघितले जाते. म्हणून सामाजिक क्षेत्रात काम करण्याची तळमळ असलेल्या युवांना “आम्ही ‘नॉनगव्हर्मेंट’, ‘नॉनप्रॉफिट’ आणि ‘सेक्युलर’ आहोत” असे अभिमानाने सांगा, असे त्यांनी आवाहनही केले.

गांधी हा व्यक्तीरूप नव्हे तर मूल्यरूप

नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘गांधी, विनोबा आणि जयप्रकाश’ या त्यांच्या पुस्तकाबद्दल सांगताना मिलिंद बोकील यांनी गांधी विचारावर चर्चा केली. ‘गांधी या काळातप्रासंगिक आहे का’ हे विचारण्यापेक्षा ‘मी प्रासंगिक आहे का’ हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा, असे ते यावेळी म्हणाले. गांधी हा व्यक्तीरूप नाही तर मूल्यरूप आहे; त्यांची सत्य, अहिंसा, शरीरश्रम, अपरिग्रह, अभय, अस्वाद, स्पर्शभावना, अस्तेय ही मुल्ये समाजात अजूनही प्रासंगिकच आहेत.  ‘उपभोगवादा’ पेक्षा उप‘योग’ करायला शिकण्याची जास्त गरज आहे. सत्याग्रही बनण्याअगोदर आधी सत्य ग्राह्य (सत्यग्राही) करायला शिकलं पाहिजे हा विनोबांचा संदेशही त्यांनी युवांना दिला.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-09


Related Photos