रशियाची कुख्यात स्नायपर युक्रेनच्या ताब्यात : ननपासून शूटर बनलेल्या महिलेने केली ४० हून अधिकांची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / कीव :
युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धाचा आज ३६ वा दिवस आहे. युक्रेनमधील शहरांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त करण्याचा रशिया सातत्याने प्रयत्न करत आहे. जगभरातील देश रशियाचा निषेध करत असताना कीव, खार्किव, ल्विव, मारियुपोल, ओडेसेसह इतर अनेक शहरांमध्ये प्रचंड विध्वंस सुरू आहे. दुसरीकडे युक्रेनही रशियासमोर हार मानायला तयार नाही. त्यामुळे रशियाच्या हल्ल्यांना युक्रेनही प्रत्युत्तर देत आहे.
यादरम्यान, युक्रेनियन सैन्याच्या हाती डॉनबास येथील एक अशी महिला लागली आहे, जिचा ते बऱ्याच काळापासून शोध घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला रशियन सैन्याची सर्वात भयानक स्नायपर असून तिचे नाव इरिना स्टारिकोवा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इरिनाने आतापर्यंत 40 हून अधिक युक्रेनियन नागरिकांची हत्या केली आहे. यामध्ये युक्रेनियन महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. इरिनाला पकडणे हे युक्रेनियन सैन्यासाठी मोठे यश मानले जात आहे
मिळालेल्या माहितीनुसार, इरिना स्टारिकोवा 2014 पासून युक्रेनविरुद्ध लढत आहे. हे युद्ध सुरू होण्यापूर्वी इरिना फुटीरतावाद्यांसह युक्रेनियन सैन्याला लक्ष्य करत असे, यामुळे तिला ताब्यात घेणे गरजेचे होते. सुरुवातीला युक्रेनचे सैनिक या महिलेला ओळखू शकले नाहीत, परंतु रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिची खरी ओळख समोर आली.
युक्रेनच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, इरिना मूळची सर्बियाची असून सैन्यात येण्यापूर्वी ती नन होती. इरीनाला दोन मुली आहेत, तर तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला आहे.  Print


News - World | Posted : 2022-03-31
Related Photos