राज्यातील नगर पंचायत व परिषदेच्या १ हजार ४१६ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  राज्यातील विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये रोजंदारी तत्त्वावर कार्यरत असलेल्या 1416 कर्मचाऱ्यांना या पालिकांच्या सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यास आणि त्यासाठी आवश्यकता भासल्यास अस्थायी पदनिर्मिती करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ 11 मार्च 1993 ते 27 मार्च 2000 या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
राज्य शासनाच्या 6 मे 2000 च्या निर्णयानुसार राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील 10 मार्च 1993 पूर्वीच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार 1416 कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यास आज मंजुरी देण्यात आली. दरम्यान कनिष्ठ अभियंता व आरोग्य निरीक्षक या पदांचा समावेश राज्य संवर्गात करण्यात आल्याने या पदावर कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे समायोजन लिपिक या पदावर करण्यात येणार आहे. या पदांना आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता तपासून त्यांचे समावेशन करण्यात येणार आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-01-08


Related Photos