महत्वाच्या बातम्या

 लाखणीत घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटपास सुरुवात


- पळसगाव रेतीघाटावरून मिळणार रेती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : शासनाच्या घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना रेती वाटप करण्याचा शुभारंभ लाखनी तालुक्यातील पळसगाव रेतीघाटावरून करण्यात आला.जिल्हा परिषद, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती वाघाये यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समिती लाखनी च्या सभापती प्रणाली सार्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत पळसगाव येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्याने भंडारा जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप करण्याची सुरुवात आज झाली.

पात्र लाभार्थ्यांना मिळणार ५ ब्रास पर्यंत रेती

घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना घराचे बांधकाम करण्यासाठी ५ ब्रास पर्यंत रेती देण्याचे, महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे.या धोरणानुसार योगेश कुंभेजकर (जिल्हाधिकारी, भंडारा) यांनी २६ मार्च २०२३ च्या पत्रान्वये, लाभार्थ्यांना रेती देण्यासाठी लाखनी तालुक्यातील पळसगाव रेतीघाट निश्चित केला आहे. या रेती घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना, घराच्या बांधकामाच्या स्थितीनुसार ५ ब्रास पर्यंत रेती मोफत देण्यात येणार आहे. रेतीघाटावरून रेती नेण्याची जबाबदारी घरकुल लाभार्थ्यांची राहणार आहे. या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कूर्तकोटी यांनी दिले आहेत.

रेतीसाठी करावा लागणार ऑनलाईन अर्ज

रेती मिळण्यासाठी लाभार्थ्यांला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याचे आधार कार्ड, ट्रॅक्टर चालकाचे लायसन, ट्रॅक्टर चे RC बुक, घरकुल मंजुरीचा दिनांक, घरकुल मंजुरीचा  नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. लाभार्थ्याच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या  https://www.mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लाभार्थ्यांला अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज भरण्यासाठी ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक (ऑपरेटर) मदत करणार आहेत. रेती वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरची नोंदणी देखील करणे आवश्यक आहे. लाभार्थ्याने सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची तपासणी करून  लाभार्थ्याला किती रेती द्यायची, याची निश्चिती घराच्या बांधकामाच्या स्थितीनुसार तहसीलदार करणार आहेत. लाभार्थ्यांच्या घराच्या बांधकामाच्या स्थिती बाबतचा अहवाल गटविकास अधिकारी देणार आहेत. तहसीलदारांच्या ऑनलाईन पडताळणीनंतर वाहतुकीसाठी आवश्यक असणारा वाहतूक परवाना (TP) ऑनलाईन पद्धतीने तयार होणार आहे. वाहतूक परवाना तयार झाल्यानंतर, त्याची माहिती घरकुल लाभार्थ्याला व ट्रॅक्टर चालकाला मोबाईलवर मिळणार आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे पारदर्शकता राहणार आहे.

तालुका प्रशासनाचे नियोजन

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास पर्यंत रेती मिळावी, यासाठी तालुका प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. लाखनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये घरकुल लाभार्थ्यांची मिटिंग घेऊन त्यांना रेती मिळण्यासाठीची कार्यपद्धती सांगितली जात आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरावा, याचे प्रशिक्षण सर्व ग्रामपंचायतीच्या संगणक परिचालक (ऑपरेटर) ना देण्यात आले आहे. वाहतूक परवाना (E-TP) देण्यासाठी पळसगाव रेतीघाटावर नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांची टीम असणार आहे. तसेच, तहसील ऑफिस व पंचायत समिती कार्यालयात यासाठी विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली असून श्रीमती धुर्वे, श्रीमती घरडे व शौर्य कंपनीचे प्रतिनिधी काम पाहत आहेत.

ही सर्व कार्यवाही जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, प्रकल्प संचालक विवेक बोन्द्रे व उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेश शितोळे व गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव करत आहेत.

घराच्या बांधकामासाठी मोफत रेती उपलब्ध होणार असल्यामुळे व पावसाळा सुरू होण्यापूर्वी घरकुलाचे काम पूर्ण करून घेणे शक्य झाल्यामुळे लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

कार्यक्रमावेळी स्वाती वाघाये (महिला व बालकल्याण सभापती), प्रणाली सार्वे (सभापती, पं.स. लाखनी), जिल्हा परिषद सदस्या श्रीमती कुंभरे, कापसे व पंचायत समिती सदस्य सुरेश झंझाड, दादु खोब्रागडे, मते, झलके, तसेच ग्रामपंचायत पळसगाव च्या सरपंच वैशाली सूर्यवंशी, उपसरपंच रवींद्र जवंजार, ग्रामपंचायत सदस्य तसेच  महेश शितोळे (तहसीलदार), डॉ. शेखर जाधव (गटविकास अधिकारी), रोहिणी डोंगरे (सहाययक गटविकास अधिकारी), उरकुडकर (नायब तहसीलदार), तलाठी मेश्राम व ग्रामसेवक अमित चुटे उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos