गडचिरोली येथील जिल्हा प्रेक्षागार मैदानाचा विकास करणार : ना. सुधीर मुनगंटीवार


-  गडचिरोली येथे सीएम चषक स्‍पर्धेचे  पारितोषिक वितरण 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  सीएम चषक स्‍पर्धा हा युवकांमधील सुप्‍त  कला व क्रिडा गुणांना चालना देणारा उपक्रम आहे. स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातुन माणुस घडतो. फक्‍त स्‍पर्धा निकोप असावी, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. गडचिरोली येथील क्रिडा संकुलाचे आधुनिकीकरण व नुतनीकरण करत विकास करण्‍याची जवाबदारी अर्थमंत्री म्‍हणुन आपण घेत असल्‍याची घोषणा त्‍यांनी यावेळी बोलतांना केली.
काल ६ जानेवारी  रोजी गडचिरोली येथे सीएम चषक स्‍पर्धेच्‍या पारितोषिक वितरण सोहळ्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी खा. अशोक नेते, आ. कृष्‍णा गजबे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा  योगिता भांडेकर, गडचिरोली नगर परिषदेच्‍या अध्‍यक्षा  योगिता पिपरे, प्रकाश पाटील पोरेड्डीवार, रवी ओलालवार, बाबुराव  कोहळे, चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे समाज कल्‍याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, चंद्रपूर मनपाचे स्‍थायी समिती सभापती राहुल पावडे, भाजपा नेते रामु तिवारी, गडचिरोली भाजयुमो अध्‍यक्ष स्‍वप्‍नील वरगंटे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन भाजयुमो गडचिरोली शहर अध्‍यक्ष तथा सीएम चषक संयोजक अनिल तिडके यांनी केले.
यावेळी बोलतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर-गडचिरोली जिल्‍हयातील युवक एकलव्‍यासारखे आहे. प्रचंड जिद्द व आत्‍मविश्‍वासाच्‍या बळावर यश कवेत घेण्‍याची शक्‍ती त्‍यांच्‍यात आहे. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्‍या विकासासाठी आपण प्रयत्‍नशिल असुन ९० कोटी रू. निधी आपण मंजुर केला आहे. गडचिरोली-वडसा रेल्‍वे मार्गासंदर्भात वनविभागाच्‍या जागेचा प्रश्‍न आपण सोडविला आहे. गडचिरोली नगर परिषद क्षेत्रातील विकासकामांसाठी ३५ कोटी रूपयांचा निधी आपण दिला असून जिल्‍हा वार्षीक योजनेअंतर्गत सुध्‍दा विशेष बाब म्‍हणून ४४  कोटी रूपयांचा विकास निधी आपण उपलब्‍ध केला आहे.  गडचिरोली जिल्‍हयाच्‍या विकासासाठी आपण वचनबध्‍द असल्‍याचे यावेळी बोलतांना म्‍हणाले.
यावेळी बोलतांना खा. अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्‍हयाच्‍या विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्‍ध केल्‍याबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. सतत विकासाचा ध्‍यास उराशी बाळगणारे अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्‍यासारखे नेते सोबत असतांना गडचिरोली जिल्‍हयाच्‍या विकासाबाबत काळजी करण्‍याचे कोणतेही कारण नसल्‍याचे ते यावेळी बोलतांना म्‍हणाले. सीएम चषक स्‍पर्धांमधील विजेत्‍यांना  यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पारितोषिकांचे वितरण करण्‍यात आले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्‍येने उपस्थिती होती.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-07


Related Photos