जंगल, नद्या, नाले तुडवून आरोग्य कर्मचाऱ्यांनी भामरागड तालुक्यात ९ हजार ९२८ बालकांचे केले लसीकरण


- गोवर - रूबेला लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी सरसावले
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड :
शासनाच्या वतीने राज्यभरात राबविण्यात आलेल्या गोवर रूबेला लसीकरण मोहिमेला भामरागड तालुक्यातसुध्दा यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नद्या, नाले आणि जंगल तुडविले. यामुळेच तालुक्यातील ९ हजार ९२८ बालकांचे लसीकरण करण्यात आले.
भामरागड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत तालुकाभरात एकूण १२१ गावात लसीकरण मोहिम राबविण्यात आली. तालुका आरोग्य विभागांतर्गत २७ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत मोहित राबविली. अंगणवाडी केंद्र, शालेय विद्यार्थी तसेच अन्य एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. शासनाच्या निर्देशानुसार मोहिम यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील जंगल, जंगलातील पायवाटा, जिथे वाहन जात नाही अशी गावे, नद्या नाले पार करून तसेच १५ ते २० किमी अंतर पायी जावून लसीकरण केले आहे. अतिदुर्गम तालुक्यातही तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मिलींद मेश्राम यांच्या पुढाकाराने लसीकरण यशस्वी करण्यात आले.
तालुक्यात ठिकठिकाणी गोवर - रूबेला बाबत जनजागृती करणारे बॅनर लावण्यात आले होते. आरोग्य विभागाचे कॅम्पस घेण्यात आले.एकूण १० हजार ७२ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट असताना ९ हजार ९२८ बालकांचे लसीकरण करण्यात आले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-06


Related Photos