महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांना प्रकल्पातून विनामुल्य सुपिक गाळ उपलब्ध होणार


- शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

- उपविभागस्तरावरच गाळ काढण्याची परवाणगी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सिंचन प्रकल्पातील गाळ काढून प्रकल्पाची पाणीधारण क्षमता वाढविणे व या प्रकल्पातील सुपिक गाळ शेतीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देऊन शेत उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी शासनाने प्रकल्पातील गाळ काढण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लगतच्या प्रकल्पातील गाळ विनामुल्य उपलब्ध होणार असून उपविभागस्तरावरच आता गाळ काढण्याची परवाणगी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

राज्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचलेला आहे. या गाळामुळे प्रकल्पांची पाणीधारण क्षमता कमी झाल्याने पर्यांयाने सिंचन क्षेत्रावर देखील त्याचा परिणाम होत आहे. हा गाळ काढल्यास धारण क्षमता वाढवून सिंचनासह पाण्याचा इतरत्र व्यापक उपयोग करता येईल. शिवाय प्रकल्पातील सुपिक गाळ शेतकऱ्यांना शेतीत टाकण्यासाठी उपलब्ध करुन दिल्यास शेतीची उत्पादकता सुध्दा वाढेल, या दुहेरी उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या नजीकच्या प्रकल्पातून सुपिक गाळ विनामुल्य उपलब्ध होणार आहे. गाळ मात्र शेतकऱ्यांना स्वखर्चाने न्यावा लागेल. यासाठी शेतकऱ्यांना संबंधित प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर पुर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवाणगी दिल्या जात होती. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी परवाणगीची प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी परवाणगीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

या योजनेसाठी खाजगी स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, ग्रामस्थ, शेतकरी अर्ज करु शकतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांचे ना-हरकत घेऊन शेतकऱ्यांना परवाणगी दिली जाणार आहे. सदर गाळ शेतकऱ्यांना विनामुल्य दिला जाणार असून यासाठी शेतकऱ्यांना स्वामित्व शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. मात्र गाळ नेण्याचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos