ग्रामविकासासाठी 'सैराट' व्हा : अभिनेत्री अनुजा मुळे


-  घाटकुळ येथे 'ग्रामसंवाद' : ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पोंभूर्णा
: गाव आदर्श करायचा असेल तर लोकांनी पुढे आले पाहिजे. गावातील युवकांनी, महिलांनी व्यसनमुक्त झाले पाहिजे. घाटकुळ गावातील लोक सामाजिक भावनेतून पुढे येत आहे, आता इथेच थांबून जमणार नाही, ग्राम विकासासाठी सर्वांनी एकत्र या आणि 'सैराट' व्हा, असे आवाहन पुणे येथील अभिनेत्री अनुजा मुळे यांनी ग्रामस्थांना केले. 
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट ग्रामपंचायत घाटकुळ आयोजित सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक मासिक नवोपक्रम 'ग्रामसंवाद' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'सैराट' या मराठी चित्रपटातील अभिनेत्री अनुजा मुळे यांनी ग्रामस्थांशी दिलखुलास संवाद साधला. मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर यांच्या संकल्पनेतून आयोजित 'ग्रामसंवाद' या कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  सरपंच प्रीती मेदाडे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स. उपसभापती विनोद देशमुख, उपसरपंच गंगाधर गद्देकर, ग्रामसेवक ममता बक्षी, ग्रामपंचायत सदस्य पत्रू पाल, अरुण मडावी, कुसुम देशमुख, सुनिता वाकुडकर, प्रज्ञा देठे, कल्पना शिंदे, रजनी हासे, मुख्याध्यापक सुनील कोहपरे, प्रफुल निमसरकार, अशोक पाल, गणपती पाल, अक्षय सांगोळे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधी व सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक दीपक चटप, वाशीमचे वैष्णव इंगोले, कोल्हापूरच्या कल्याणी मानगावे, गडचिरोलीचे बोधी रामटेके, पुण्याचे विक्रांत खरे यांची विशेष उपस्थित होती.
महाराष्ट्रात व देशात जी गावे पुढे आली ती लोकसहभागातूनच आदर्श झाली असे मार्गदर्शन करताना 'सैराट' या चित्रपटातील अनुभव कथन अभिनेत्री अनुजा मुळे यांनी गावकर्‍यांना सांगितले.  जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना मिस्कील उत्तरे दिली. विधी व सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक दीपक चटप यांनी गाव समृद्ध करायचा असेल तर लोकसहभाग आणि श्रमदानाशिवाय पर्याय नाही. शासकीय योजना आपल्या पाठीशी आहे पण गावकऱ्यांनी कृतीयुक्त झाले पाहिजे असे मत व्यक्त केले. कल्याणी मानगावे यांनी मला शहरापेक्षा गाव बरा वाटतो ही भावना व्यक्त केली व महिला सक्षमीकरणावर मार्गदर्शन केले. पर्यावरणाचे अभ्यासक वैष्णव इंगोले यांनी गावाच्या सभोवतालचे पर्यावरणाचे संवर्धन करणे आपल्या हाती असल्याचे मत व्यक्त करताना कृषी न्यायाधिकरण कायद्यासंदर्भात मार्गदर्शन केले. गावातील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन समृद्ध व्हावे व गावाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन बोधी रामटेके यांनी केले.
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट ग्रामपंचायत घाटकुळ आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे. गावातील नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून सामाजिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक 'ग्रामसंवाद' हा मासिक नवोपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर यांनी प्रास्ताविकातून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रामकृष्ण चणकापूरे यांनी केले. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. श्रमदानातून कामे करण्याचा संकल्प यावेळी गावातील युवकांनी केला आहे हे विशेष.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-05


Related Photos