महत्वाच्या बातम्या

 राज्याच्या महसूल विभागात तब्बल १३ हजार पदे रिक्त : सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील महसूल विभागातील तब्बल १३ हजार ५३६ पदे रिक्त असून यामुळे सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा होत आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांमधील या रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एखाद्या कामासाठी सर्वसामान्यांना वारंवार महसूल कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र राज्यात आहे.

शेतकऱ्यांचा वारंवार संपर्क येणाऱ्या तलाठ्यांची महसूल विभागात सर्वाधिक रिक्त पदे असून हा आकडा ५ हजार ३० इतका आहे. तहसीलदार ६६ पदे, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची ५२३ पदे रिक्त आहेत. महसूल विभागातील या रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक कामांची जबाबदारी येऊन पडत आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे त्यांच्याकडील कामेही प्रलंबित राहत आहेत. त्यात नैसर्गिक आपत्ती आली की पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात महसूल यंत्रणा गुंतते आणि मग प्रलंबित कामाचा ढीग वाढतच जातो.

तलाठी पदभरतीची केवळ घोषणा

- महसूल विभागाने २९ नोव्हेंबर रोजी पत्र काढून तलाठी संवर्गातील ४ हजार १२२ पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर अशा सर्व महसूल विभागातील ही रिक्त पदे एकाच वेळी भरण्यात येणार आहेत.

- मात्र यासंदर्भात घोषणेपलीकडे काहीही झाले नसून तलाठी भरतीसंदर्भात अद्याप जाहिरातही प्रसिद्ध झालेली नाही. सध्या रिक्त पदांचा भार इतर तलाठ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या विविध कामांना विलंब होत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos