माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


-  डॉ. अरुणा पाटील यांनी केले अंत्यसंस्कार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
नागपूर  : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण माजी न्यायमूर्ती  चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावर शासकीय इतमामात अंबाझरी  घाटावर  शोकाकुल वातावरणात विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची कन्या  डॉ. अरुणा पाटील यांनी  अंत्यसंस्कार केला.
माजी न्यायमूर्ती व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पार्थीवावर पुष्पचक्र अर्पण  करुन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पोलीस महासंचालकांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले. सशस्त्र पोलीस दलाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचे पार्थीव राष्ट्रध्वजामध्ये ठेवण्यात आले होते. पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर राष्ट्रध्वज नातोवाईकांना स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
यावेळी  न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, ॲड. आशुतोष धर्माधिकारी, डॉ. अरुणा पाटील तसेच   न्या. डी. एन. धर्माधिकारी, न्या. आर. के. देशपांडे, न्या. विकास शिरपूरकर, उद्योगपती राहुल बजाज, डॉ. अभय बंग, श्रीमती राणी बंग, अशोक जैन तसेच त्यांचे सर्व नातवंडं व नातेवाईेकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर विद्युत दाहिनीमध्ये मुलगी डॉ. अरुणा पाटील यांनी शेवटी  अंत्यविधी संस्कार  केला.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती आर. के. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. यावेळी राज्यातून आलेल्या विविध मान्यवरांनी मौन श्रद्धांजली वाहिली.
अंत्यसंस्कारासाठी गांधी संशोधन प्रतिष्ठान, सेवाग्राम आश्रम समिती, राहुल बजाज तसेच बजाज समूहाच्या विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, बजाज कुटुंबीय, न्यायमूर्ती सर्वश्री जे. ए. हक, अतुल चांदुरकर, मनीष पिंपळे, रोहित देव, व्ही. एम. देशपांडे, मुरलीधर गिरडकर, विनायक जोशी, ज्येष्ठ  गांधीवादी सुगंध बरंठ, जयंत मटकर, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे प्रो. मनोज कुमार,  कुलसचिव प्रो. के. के. सिंह. मा. म. गडकरी, गौतम बजाज तसेच  सामाजिक, राजकीय विविध मान्यवर उपस्थित होते.  Print


News - Nagpur | Posted : 2019-01-03


Related Photos