सर्व शासकीय कार्यालये २६ जानेवारीपर्यंत तंबाखूमुक्त करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह


- मुक्तिपथच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
मुक्तिपथ कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक काल २ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे घेण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुक्तिपथ प्रकल्पाचे सल्लागार डॉ. अभय बंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड व सर्व शासकीय विभागाप्रमुख व प्रतिनिधीं हजार होते. सर्वप्रथम २७ सप्टेंबर २०१८ ला झालेल्या मागील बैठकीचा आढावा घेण्यात आला. तंबाखू नियंत्रण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देतानाच सर्व शासकीय कार्यालये २६ जानेवारीपर्यंत तंबाखूमुक्त करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना दिले.  
बैठकीत घेतलेल्या निर्णयांचे पालन सर्वांकडून करवून घेण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखाने जातीने लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात खर्रा व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम आणि असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत काम करणाऱ्या समुपदेशकांनी रुग्णांचे नियमित समुपदेशन करण्याबाबत सांगण्यात आले. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि समुपदेशकांना व्यसनमुक्तीबाबत सर्च मध्ये तीन दिवशीय प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले. गरोदर मातांची तपासणी करताना त्यांचेही तंबाखू सेवनाबाबत समुपदेशन करावे, सर्व शासकीय रुग्णालयांतून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या चिठ्ठीवर तंबाखू हानिकारक असल्याचा संदेश लिहावा. सर्व शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःची मुखरोग तपासणी करून तसे प्रमाणपत्र वरिष्ठांना सादर करण्याबाबत यावेळी सांगण्यात आले. शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथच्या सहकार्यातून प्रत्येक शाळेत मुक्तिदिन कार्यक्रम घ्यावा व यासाठी आधी शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात यावी, सर्व शासकीय कार्यालये, दवाखाने आणि शाळांच्या १०० मीटर परिसरात सुगंधित तंबाखुयुक्त पदार्थ विकण्यावर बंदी आहे, अशा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई करावी. सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर पोलीस, अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने आवश्यक कारवाई करावी. कारवाई मध्ये किमान करताना ५ हजार रुपये दंड आकारावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आपल्या क्षेत्रातील दारू व तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई न करणाऱ्या पोलीस पाटलांवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. नंदू मेश्राम, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत उचेकर, डॉ. कन्ना मडावी यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-03


Related Photos