आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले बाळ व बाळंतीणीचे प्राण


- तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. मिलींद मेश्राम यांनी घेतला पुढाकार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
बाळंत झाल्यानंतर अचानक प्रकृती खालावलेल्या बाळ आणि बाळंतीणीला वाचविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. यामुळे बाळ आणि बाळंतीणीचे प्राण वाचल्याची घटना भामरागड तालुक्यात घडली आहे.
तालुक्यातील आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या पोयूरकोठी येथील प्रियंका साधू मुंहदा १९ या महिलेची पहिली प्रसुती घरीच झाली होती. प्रसुती झाल्यानंतर तिची अचानक प्रकृती खालावली. यामुळे आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती देण्यासाठी एक व्यक्ती पोहचली. माहिती मिळताच तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. मिलींद मेश्राम हे आपल्या चमुसह पोयूरकोठी येथे पोहचले. या ठिकाणी महिलेवर प्रथमोपचार करण्यात आला. प्रियंकाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रक्तदाब मंदावला होता. यानंतर तिला हेमलकसा येथे उपचारासाठी नेण्यात आले. या ठिकाणीही प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. यामुळे प्रियंकाला लगेच अहेरी येथे हलविण्यात आले. या ठिकाणीही काही होवू शकले नाही. यामुळे तिला गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालय आणि नंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले. चंद्रपूर येथे उपचार सुरू असताना आज ३ जानेवारी रोजी तिसऱ्या दिवशी बाळ आणि बाळंतीणीच्या प्रकृतीत सुधारणा झाली. या सर्व प्रवासादरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. मिलींद मेश्राम हे स्वतः सोबत होते. 
बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप होईपर्यंत संपूर्ण चमु काळजी घेूत होते. पोयूरकोठी येथे आशा कार्यकर्ती नाही. आशा कार्यकर्ती असती तर वेळीच माहिती आरोग्य विभागास दिली असती आणि महिलेची प्रसुती वेळेवर रूग्णालयात झाली असती. मात्र पोयूरकोठी या गावात संपर्काचेही साधन नसल्यामुळे १०८  क्रमांकाची रूग्णवाहिकासुध्दा बोलावता आली नाही. एवढेच नाही तर भामरागड ग्रामीण रूग्णालयात स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ सुध्दा नाही. जर ही पदे असती तर सदर महिलेला चंद्रपूर पर्यंत प्रवास करण्याची वेळ आली नसती. आरोग्याच्या सोयी - सुविधांअभावी दुर्गम गावातील रूग्णांवर जीव जाण्याची पाळी येत आहे. 
आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेचे चालक पिंटूराज मंडलवार यांनीच स्वतः रूग्णवाहिका चालवून सदर बाळ आणि बाळंतीणीला भामरागडपासून चंद्रपूरला पोहचविले. यावेळी प्रियंकाचे नातेवाईक, आरोग्य सेविका वंदना भारती, सपना कुमरे उपस्थित होते. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-03


Related Photos