बाबलाई माता वार्षिक पूजा व पारंपारिक संमेलनात उसळली भाविकांची गर्दी


- आदिवासींच्या आराध्य दैवतांचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
मनिष येमुलवार / भामरागड :
बाबलाई माता हे आदिवासींचे आराध्य पेन म्हणजेच दैवत आहे. भामरागड तालुक्यातील बेजूर या गावाला लागून असलेल्या कोंगामेटा पहाडाखाली वसलेल्या बाबलाई मातेची पूजा अर्चा पारंपारिक पध्दतीने दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत असते. त्या अनुषंगाने यावर्षीसुध्दा तालुक्यातील आदिवासी जनतेने एकत्र येत आदिवासी दैवतांचे दर्शन घेतले.
भामरागड पट्टी गोटूल समिती व सर्व ग्रामसभा, पेरमा, भूमिया, गायता, कोतवाल, मांजी या सर्वांनी एकत्र येवून बाबलाई मातेच्या परिसरात यात्रेचे आयोजन केले. काल १  जानेवारी ते उद्या ३ जानेवारी पर्यंत या जत्रेत तालुक्यातील संपूर्ण आदिवासी जनता सहभागी होणार आहे. यावेळी भामरागड पट्टीतील सर्व ग्रामसभा व भूमिया, पेरमा, गायता, कोतवाल, मांजी व व्यापक यांच्यासोबत खुले चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्रात जल, जमीन, जंगल व खदाण या विषयांवर पूर्णपणे आदिवासींचा अधिकार असल्याचा पेसा कायद्यात नमूद असताना शासन मात्र आदिवासींच्या परवानगीशिवाय पहाडींवरील खनीज संपत्तीची वाहतूक करीत असल्याचे सांगताना जि.प. सदस्य लालसू नोगोटी यांनी आमच्या हक्काचे जल, जंगल, जमीन यावर आमचाच अधिकार आहे. शासन गैरमार्गाने वाहतूक करीत असून यावर व्यापक चर्चासत्र उद्या ३ जानेवारी रोजी होणार असल्याचे सांगितले.
बाबलाई मातेची पारंपारिक पुजा शेकडो वर्षांपासून सुरू असून या ठिकाणी शेकडो वर्षांपासून नक्षीकाम केलेल्या कोरीव देवदेवतांच्या मूत्र्या आहेत. १९४८ मध्ये बांधलेली विहिरसुध्दा या ठिकाणी पहावयास मिळते. विशेष म्हणजे बाबलाई मातेकडे जात असताना वाटेत छोटासा नाला येतो. हा नाला बाराही महिने वाहत असतो. 
या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी पांरपारिक वेशभुषा, वाद्य, नृत्य, रेलानृत्य असे विविध सांस्कृतिक दर्शन होणार आहे. भामरागड पट्टीतील आदिवासी बांधव बाबलाई मातेच्या मंदिर परिसरात तीन दिवस मुक्कामी राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतात. प्रशासनाने या भव्य जत्रेची दखल घेवून प्रेक्षणियस्थळ, धार्मिक स्थळ म्हणून मंजूरी द्यावी, अशी येथील जनतेची मागणी आहे.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-01-02






Related Photos