बल्लारपूर पेपरमिल मधील मृतक कामगाराचे शव मागण्या पूर्ण झाल्यानंतरच हलविले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर
: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी काल १ जानेवारी रोजी बल्लारपूर पेपरमिलमध्ये काम करीत असताना पल्पचा जुगाड तुटून पल्प हंडीत पडून मृत्यू झालेल्या मृतकाचे प्रेत आज दुसऱ्या दिवशी हलविण्यात आले. कुटुंबीयांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतरच मृतकाचे प्रेत हलविण्यात आले आहे.
संतोष पांडे (४१) हा कामगार काम करीत असताना जुगाड तुटून खालील पल्पच्या हंडीत पडून मृत्यू झाला होता. यानंतर कामगारांनी आंदोलन करून कुटूंबीयांना ३० लाख रूपयांची मदत तसेच कुटूंबातील एका सदस्याला स्थायी नोकरी देण्याची मागणी केली. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रेत उचलणार नाही, असा पवित्रा घेतला. कामगारांना समजावण्यासाठी पेपर मिल प्रशासनाला पोलिसांची मदत घ्यावी लागली होती. तडजोडीअंती आज २ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता पेपर मिल प्रशासनाने १४ लाख ५० हजार रूपये तसेच पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून २ लाख रूपये तसेच कुटूंबातील एका सदस्याला स्थायी नोकरी देण्याचे मान्य केले. यामुळे प्रेत रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-01-02


Related Photos