महत्वाच्या बातम्या

 वासाळा ग्रा.पं.च्या सरपंचा रत्नमाला सेलोटे झाल्या पायउतार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वासाळा ग्रामपंचायतच्या सरपंचा रत्नमाला सेलोटे यांचे पती विलास सेलोटे यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याने सरपंचा रत्नमाला सेलोटे यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (०१) अन्वये ग्रामपंचायत सदस्य व सरपंच म्हणून राहण्याचा अधिकार नाही. याबाबतचा निर्णय नागपूर विभागीय अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी दिला. त्यामुळे वासाळा ग्रा.पं.च्या सरपंचा रत्नमाला सेलोटे ह्या सरपंच व सदस्य पदावरून पायउतार झाल्या.

वासाळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा उज्वला मंगरे, सदस्य, अविनाश सहारे, अनिल जराते, अस्मिता खोब्रागडे, चंदा थोरात, नेहा कोल्हे आदी सहा ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचा रत्नमाला सेलोटे यांच्याविरोधात विविध विषयावर आरमोरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गडचिरोली जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. 

तक्रारीत ग्रामपंचायत वासाळा येथे १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत नळ योजना दुरुस्ती करण्याच्या कामाची अंदाजे किंमत १,६६,०९८ रुपये असून सदर काम ही निविदा प्रणालीद्वारे ग्रामपंचायत सरपंच सचिव यांचे सहीनिशी इ- निविदा ०१ जुलै २०२१ रोजी आली होती. परंतु सदर निविदा उघडली नसताना सुद्धा सदर कामाला सरपंचा यांनी सुरुवात केली व काम अंतिम टप्यात आले असतांना स्वतः सरपंच व त्यांचा पती यांनी स्वतःचा मनमर्जीने काम केले. 

सदर कामाकरिता मजूर म्हणून सरपंच व त्यांच्या पतीने काही मजूर कामाला लावले. तसेच ग्रामपंचायत वासाळा येथील नाली उपसा व गाळ फेकणे याबाबत फेरनिविदा काढणे बंधनकारक असतांना सरपंच व त्यांच्या पतीने स्वतःच्या मनमर्जीने आपल्या जवळच्या व्यक्तीला सर्व नियम धाब्यावर बसवून नाली उपसा व गाळ फेकण्याचा ठेका दिला. तसेच ग्रामपंचायत वासाळा येथे लाईट व ब्लिचिंग पावडर सरपंच व तिचे पती यांनी स्वतः घेतले होते. याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अप्पर आयुक्तांनी सरपंचास अनर्ह ठरविण्याचा आदेश पारीत केला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos