तलवार, चाकूने वार करून तिघांना जखमी करणाऱ्या आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
तीन जणांवर तलवार तसेच चाकूने वार करून जखमी करणाऱ्या आरोपीस वर्धा येथील न्यायालयाने कलम ३०७ अन्वये तीन वर्ष सश्रम कारावास व ५०० रूपयांचा दंड ठोठावला आहे.
यशवंत शामराव वंजारी (५०) रा. धंतोली वर्धा, अमोल यशवंत वंजारी (२५)  व हरीश कैलास पेंदाम (२८) रा. बुरड मोहल्ला इतवारा वर्धा अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वर्धा येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश विजयकुमार पाटकर यांनी निकाल दिला आहे.
११ मार्च २०१४ रोजी जखमी निलेश ढोरे, वैभव देवगिरकर व सुरज पाखडे हे धांतोली चौकात  किराणा दुकानाच्या ओठ्यावर बसून असताना  आरोपींवर सुरू असलेली ३२६ भादंवी चे प्रकरण मागे घेण्याच्या कारणावरून वाद घातला. यावेळी आरोपी यशवंत वंजारी याने निलेश ढोरे याच्या डोक्यावर काठीने मारले. आरोपी हरीशने निलेश याच्या डाव्या बाजूला तलवारीने वार केले. यावेळी सुरज पाखडे, वैभव देवगिरकर यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी हरीश पेंदाम व अमोल वंजारी या आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते दोघेही जखमी झाले. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक मुर्लीधर बुराडे यांनी केला. प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. शासनातर्फे १२ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली.

   Print


News - Wardha | Posted : 2018-12-31


Related Photos