इरफान शेख, अविनाश पोईनकर यांना विदर्भ साहित्य संघाचे वाड:मय पुरस्कार जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
साहित्य क्षेत्रात अतिशय मानाचे व प्रतिष्ठित समजले जाणारे विदर्भ साहित्य संघ नागपूरचे वाड:मय पुरस्कार नुकतेच  जाहीर झाले. चंद्रपूर येथील प्रसिद्ध कवी इरफान शेख व बिबी येथील कवी अविनाश पोईनकर यांच्या सध्या सर्वत्र गाजत असलेल्या कवितासंग्रहांना  यंदाचे वाड:मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. विशेषता कवितेसाठी दिले जाणारे दोन्ही महत्त्वाचे पुरस्कार पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्यातील लेखकांना मिळाल्याने साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
चंद्रपूर येथील कवी इरफान शेख यांच्या 'माझ्यातला कवी मरत चाललाय' या काव्यसंग्रहासाठी 'सर्वोत्कृष्ट काव्य पुरस्कार' जाहीर झाला आहे. त्यांच्या कवितेचा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या बी.ए भाग २ अभ्यासक्रमात देखील समावेश करण्यात आला आहे. विदर्भातील नव्या पिढीच्या कवी-लेखकांच्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी दिला जाणारा 'नवोदित लेखन पुरस्कार' बिबी येथील कवी अविनाश पोईनकर यांच्या 'उजेड मागणारी आसवे' या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळाने त्यांचा हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात १४ जानेवारीला नागपूर येथे यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, प्रख्यात कवयित्री व लेखिका अरुणा ढेरे यांच्या हस्ते पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. चंद्रपूरातील अग्रगण्य सुर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष असलेले कवी इरफान शेख यांनी जिल्ह्याला साहित्य क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे. राजूरा,कोरपना,जिवती, गोंडपिपरी या आदिवासीबहुल परिसरात अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानच्या माध्यमातून कवी अविनाश पोईनकर काव्य लेखनासोबतच साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत कार्यरत आहे. यंदा कवितासंग्रहासाठी दिले जाणारे दोन्ही पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्याला मिळाल्याने इरफान शेख व अविनाश पोईनकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-31


Related Photos