नवीन वर्षात पेट्रोल - डिझेल १० ते १५ रुपयांनी स्वस्त होणार


वृत्तसंस्था / नवीदिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने नववर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी कपात होणार. २०१९ मध्ये पेट्रोल - डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याशिवाय सरकारकडून मिथेनॉलयुक्त पेट्रोल विकण्याची परवानगी मिळताच पेट्रोल-डिझेल १० ते १५ रुपयांनी स्वस्त होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत घसरण सुरू असून बुधवारी क्रूड ऑइल ५० डॉलर प्रति बॅरल दराने विकले जात होते. दोन ऑक्टोबर २०१८ मध्ये क्रूड ऑइल ८५.६ डॉलर प्रति बॅरलदराने विकले जात होते. तेव्हापासून आजपर्यंत कच्या तेलाच्या दरांत घट होवून जवळपास ७१ टक्क्यांची घसरण झाली आहे.
नीती आयोगाच्या देखरेखीखाली सरकार देशभरात १५ टक्के मिथेनॉल मिसळलेलं पेट्रोल आणण्याची तयारी करत आहे. यासाठी पुण्यात चाचण्याही सुरु झाल्या आहेत. जर सरकारची योजना यशस्वी झाली तर पेट्रोल १० रुपयांनी स्वस्त होणार आहे. मिथेनॉल कोळशापासून तयार केलं जातं. सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल मिसळलं जातं. इथेनॉल ऊसापासून तयार केलं जातं. इथेनॉलसाठी प्रती लीटर ४२ रुपये खर्च होतात. तर मिथेनॉलसाठी २० रुपये प्रती लीटर खर्च येतो. इथेनॉलच्या तुलनेत मिथेनॉल स्वस्त असल्यानेच या पर्यायाचा विचार केला जात आहे. तसंच मिथेनॉलमुळे प्रदूषणही कमी होतं. नीती आयोगाच्या देखरेखीखाली पुण्यात मिथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची चाचणी सुरु करण्यात आली आहे.
News - World | Posted : 2018-12-30