विरोधकांना नाउमेद करण्याची भूमिका विद्यमान सरकार घेत असून देशात आणीबाणी सदृश स्थिती : शरद पवार


वृत्तसंस्था / अहमदनगर :  सरकारकडून देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये हस्तक्षेप केला जात आहे. विरोधकांना नाउमेद करण्याची भूमिका विद्यमान सरकार घेत असून देशात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  केला आहे.  
शरद पवार पत्रकार परिषदेत  बोलत होते.  देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. सीबीआयसारखी सर्वोच्च तपास संस्थाही यापासून दूर राहिली नाही. क्रमांक एकचे अधिकारी आणि क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप आहेत. प्रकरण न्यायालयात गेले आहे. तीच गत आज भारतीय रिझर्व्ह बँकेची झाली आहे. रघुराम राजन यांनी राजीनामा दिला. मोदींनी गुजरातेतून उर्जित पटेल यांना आणले. पण त्यांच्याबरोबर यांचे जमले नाही. आरबीआयच्या पैशावर यांचा डोळा होता. त्याला पटेल यांनी विरोध केला. अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आताही त्यांनी त्यांचाच माणूस बसवला आहे. आपल्या संस्था डळमळीत होत आहेत. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते.
आज विरोधकांना नाउमेद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑगस्ट वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात असलेल्या ख्रिश्चियन मिशेलने सोनिया गांधी यांचे नाव घेणे हा कटाचाच भाग आहे. त्याने सोनियांचे नाव घेतले. हे कोण ऐकले आहे ? इडीच्या अधिकाऱ्याने ते ऐकले आणि त्याने सर्वांना सांगितले की मिशेलने सोनियांचे नाव घेतले. ते खरे आहे की नाही याची कोणालाच माहिती नाही, असेही पवार म्हणाले. 

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४० जागांवर एकमत झाले असून ८ जागांसाठी चर्चा सुरू आहे. तोही प्रश्न लवकरच निकाली लागेल. त्यामुळे आमच्यात जागावाटपावरून कोणताही गोंधळ नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.   Print


News - Rajy | Posted : 2018-12-30


Related Photos